नवरा-बायकोने मिळून बांधलेल्या घरकुलांचाच धडाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2022 05:00 AM2022-03-14T05:00:00+5:302022-03-14T05:00:12+5:30

जिल्ह्यात २०१६ ते २०२२ या सहा वर्षांच्या काळात विविध योजनांमधून ६० हजार ६३७ घरकुले मंजूर करण्यात आली. मात्र घरकूल मंजूर झाल्यावर प्रशासनाच्या पाठपुराव्यासह स्वत:ही मेहनत घेऊन घरकूल बांधून पूर्ण करणे ही लाभार्थ्याची जबाबदारी असते. अशावेळी नवरा-बायको दोघेही संसारासाठी एकदिलाने एकत्र आले तर घर बांधून पूर्ण होतेच. त्याचाच प्रत्यय या योजनेतही आला.

Husband and wife built the house together | नवरा-बायकोने मिळून बांधलेल्या घरकुलांचाच धडाका

नवरा-बायकोने मिळून बांधलेल्या घरकुलांचाच धडाका

Next

अविनाश साबापुरे
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : घर असते दोघांचे... दोघांनी मिळून सावरायचे... या कवितेसारखीच जिल्ह्यातील घरकूल योजनेची ताजी स्थिती पुढे आली आहे. भले रोज मजुरी करत असतील, पण ज्या नवरा-बायकोने दोघांच्याही एकत्रित नावाने घरकुलासाठी अर्ज केला, त्यांचे घरकूल बांधून पूर्णही झाले अन् त्यात त्यांचा संसारही गोडीगुलाबीने बहरला. तर ज्या महिलेने वा पुरुषाने एकट्याच्याच नावाने घरकूल मागितले, त्याला मंजुरी तर मिळाली; पण त्याचे बांधकामच झालेले नाही.
जिल्ह्यात २०१६ ते २०२२ या सहा वर्षांच्या काळात विविध योजनांमधून ६० हजार ६३७ घरकुले मंजूर करण्यात आली. मात्र घरकूल मंजूर झाल्यावर प्रशासनाच्या पाठपुराव्यासह स्वत:ही मेहनत घेऊन घरकूल बांधून पूर्ण करणे ही लाभार्थ्याची जबाबदारी असते. अशावेळी नवरा-बायको दोघेही संसारासाठी एकदिलाने एकत्र आले तर घर बांधून पूर्ण होतेच. त्याचाच प्रत्यय या योजनेतही आला. ३८ हजार ९१९ दाम्पत्यांपैकी तब्बल २६ हजार ७०६ जोडप्यांनी आपले घरकूल पूर्ण करून त्यात आनंदाने राहायलाही गेले. त्याचवेळी एकट्या महिलेला किंवा एकट्या पुरुषाला घरकूल बांधण्यात असे यश आल्याचे दिसत नाही. जिल्ह्यातील ७ हजार ३७० पुरुषांनी एकट्याच्याच नावाने घरकूल मंजूर करून घेतले; पण त्यातील २ हजार २९५ पुरुषांना सहा वर्षे उलटूनही घर पूर्ण करता आलेले नाही. हीच अवस्था एकट्या महिलेचीही आहे. तब्बल ११ हजार ८१४ महिलांना स्वतंत्ररीत्या घरकूल मंजूर होऊनही त्यातील ३ हजार ४६६ महिलांचे घर पूर्ण होऊच शकले नाही.
जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास ही केंद्र पुरस्कृत योजना तसेच शबरी आवास, रमाई आवास, पारधी आवास, आदिम आवास, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत, अटल बांधकाम कामगार आवास आदी राज्य पुरस्कृत घरकूल योजना डीआरडीएमार्फत राबविल्या जात आहेत. त्यात घरकूल मंजूर होण्यापासून तर त्याचे बांधकाम पूर्ण होण्यापर्यंतच्या कामात ‘एकट्या’ अर्जदारापेक्षा ‘दाम्पत्य’ अर्जदारांचाच धडाका दिसून येतो. बंगला असो वा छोटेसे घरकूल, ते बांधण्यासाठी रेती-सिमेंट लागतेच, पण त्या घरकुलाला ‘पूर्णत्व’ येण्यासाठी नवरा-बायकोचे प्रेमच हवे.

एकटी महिला पुरुषांच्या पुढे

विधवा, निराधार असलेल्या अनेक महिलांना घरकुल मंजूर झाल्यानंतर त्यांनी प्रशासनाकडे सतत पाठपुरावा करून आपले घरकूल पूर्ण करून घेतले. वेळप्रसंगी स्वत:च्या मजुरीतून गोळा केलेले पैसे लावून बांधकाम केले. अशा महिलांची संख्या आठ हजारांवर आहे. त्या तुलनेत पुरुष लाभार्थी केवळ पाच हजार आहेत.

१८ हजार घरे केवळ कागदावरच

गोरगरिबांना हक्काचा निवारा मिळावा म्हणून जिल्ह्यात सहा वर्षात ६० हजारांपेक्षा अधिक घरकुले मंजूर करण्यात आली. मात्र त्यात राज्य योजनेतील ५७६६ आणि केंद्र पुरस्कृत योजनेतील १३०८२ अशी १८ हजार ८४८ घरकुले अद्यापही बांधकामाच्या प्रतीक्षेत आहेत. तर ४१ हजार ७८९ घरकुले पूर्ण झाली. त्यात राज्य योजनेच्या १४२१७ तसेच केंद्र पुरस्कृत योजनेच्या २७५७२ घरांचा समावेश आहे.

 

Web Title: Husband and wife built the house together

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.