चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच केला पत्नीचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2021 03:57 PM2021-10-28T15:57:15+5:302021-10-28T16:01:36+5:30
दारूच्या आहारी गेलेल्या पतीने संशयाच्या रागातून पत्नीचा चाकूने वार करत खून केला. ही थरकाप उडविणारी घटना आईच्या कुशीत झोपलेल्या दोन्ही मुलांनी पाहिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : संशयाचे भूत डोक्यात शिरल्याने पत्नीचा काटा काढणाऱ्या पतीला अखेर जन्मठेप झाली. या घटनेला जवळपास पाच वर्षांचा कालावधी लोटला आहे. घटनेनंतर आरोपींचे पुढे काय झाले, हे बहुतांशवेळा लोकांना माहीत नसते. असाच एक विस्मरणात गेलेला खून खटला आरोपीला जन्मठेप झाल्यामुळे नव्याने चर्चेत आला आहे. स्वत:च्या दोन लहान मुलांनीच आईची हत्या करणाऱ्या बापाविरोधात साक्ष दिली. आरोपी बापाला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
महागाव तालुक्यातील चिल्ली इजारा या गावचं सर्वसामान्य कुटुंब. कैलास प्रल्हाद चव्हाण (४०) हा कामानिमित्त पुण्याला गेला होत. काम करत असतानाच कैलास दारूच्या आहारी गेला होता. तेव्हापासून कुटुंबामध्ये वादविवाद सुरू झाले. कैलासला पत्नी वंदनाच्या वागण्या-बोलण्यात फरक जाणवू लागला. तो दारू पिऊन वंदनाला बेदम मारहाण करीत होता. पतीची वर्तणूक आज-उद्या सुधारेल या आशेवर वंदना दिवस काढत होती.
या दोघांच्या संसारात त्यांना दोन मुलं झाली. मात्र, आदर्श व यश यांना पाहूनही कैलासच्या वागण्यात बदल होत नव्हता. तो घरी दारू पिऊनच गोंधळ घालायचा. यामुळे वंदनाही कैलासशी फटकून वागत होती. त्रास असह्य झाल्याने वंदनाने मुलांना घेऊन आपले माहेर चिल्ली इजारा येथे आली होती. आई-वडिलांसोबत राहात असतानाच पाहुणपणाला कैलास सासरी आला. त्याने झोपेतच पत्नीवर विळ्याने वार केले. त्याला थांबविण्यासाठी पुढे आलेल्या इतर सदस्यांवरही कैलासने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी दयानंद जाधव यांच्या तक्रारीवरून महागाव पोलिसांनी भादंवि ३०२, ३२६ कलमान्वये गुन्हा दाखल केला. घटनेच्या रात्रीच आरोपीला गावातून अटक करण्यात आली. आरोपी घटनेपासून न्यायालयात दोषी ठरेपर्यंत कारागृहातच होता.
तपास अधिकारी तत्कालीन ठाणेदार प्रकाश शेळके, पोलीस शिपाई अतुल पवार, सुनील पंडागळे यांनी गुन्ह्यात वापरलेला विळा, रक्ताने भरलेली माती, कपडे यांचा रासायनिक परीक्षण अहवाल व साक्षपुराव्याच्या आधारे आरोपीला जन्मठेप झाली. पुसद येथील सत्र न्यायालयाने ३०२ अंतर्गत जन्मठेप, ३२६ अंतर्गत तीन वर्ष कारावास व दोन लाख रुपये दंडाची शिक्षा ९ जुलै २०२१ रोजी ठोठावली.
ती रात्र ठरली काळरात्र
वंदना आपल्या माहेरी झोपलेली असताना १५ सप्टेंबर २०१६ च्या रात्री कैलासने तिच्या अंगावर बसून गळ्यावर सपासप वार केले. ही थरकाप उडविणारी घटना आईच्या कुशीत झोपलेल्या आदर्श व यश या दोन्ही मुलांनी पाहिली. त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर नातेवाईक जमा झाले. डोक्यात सैतान शिरलेला कैलास काही ऐकण्याच्या मानसिकतेत नव्हता. त्याच्या हातातील विळा लागून संगीता जाधव यासुद्धा जखमी झाल्या.
वडिलांना सोडण्यासाठी मुलांनी केली दया याचना
खुनाचा खटला पुसद सत्र न्यायालयात सुरू होता. यातील महत्त्वाचे साक्षीदार आरोपीची दोन मुलेच होती. शिवाय, त्याच्या हल्ल्यात जखमी झालेली महिला साक्षीदार ठरली. आईला बाबानेच मारले. मात्र, आता त्यांना काही करू नका, अशी दया याचना ते चिमुकले मुलं न्यायालयात करीत होते. तपास अधिकारी म्हणून ठाणेदार प्रकाश शेळके यांची तब्बल चार तास साक्ष चालली. अचूक व बारकाईने तपास केल्यामुळेच या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा झाली.