पती महेशनेच गळा आवळून केली दीपालीची हत्या, शवविच्छेदनातून उघड; तक्रारीनंतर रस्त्यातच थांबविली होती अंत्ययात्रा

By विशाल सोनटक्के | Published: February 16, 2024 08:35 PM2024-02-16T20:35:50+5:302024-02-16T20:36:34+5:30

...मात्र डायल ११२ वरून महिलेचा मृत्यू संशयास्पद असल्याची तक्रार आल्यानंतर ही अंत्ययात्रा थांबवून पोलिसांनी शवविच्छेदनासाठी मृतदेह ताब्यात घेतला होता.

Husband Mahesh killed Deepali by strangulation, autopsy revealed; After the complaint, the funeral procession was stopped on the road | पती महेशनेच गळा आवळून केली दीपालीची हत्या, शवविच्छेदनातून उघड; तक्रारीनंतर रस्त्यातच थांबविली होती अंत्ययात्रा

पती महेशनेच गळा आवळून केली दीपालीची हत्या, शवविच्छेदनातून उघड; तक्रारीनंतर रस्त्यातच थांबविली होती अंत्ययात्रा

यवतमाळ : शहरातील जामनकरनगर येथे गुरुवारी एका २८ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्यानंतर दुपारी तिची अंत्ययात्रा पांढरकवडा रस्त्याने निघाली. मात्र डायल ११२ वरून महिलेचा मृत्यू संशयास्पद असल्याची तक्रार आल्यानंतर ही अंत्ययात्रा थांबवून पोलिसांनी शवविच्छेदनासाठी मृतदेह ताब्यात घेतला होता. अखेर किरकोळ भांडणातून पतीनेच दीपालीचा गळा आवळून खून केल्याचे उघड झाले असून पोलिसांनी या प्रकरणात महेश मिश्रा विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करीत त्यास बेड्या ठोकल्या आहे. 

दीपाली ऊर्फ नंदिनी महेश मिश्रा (२८, रा. जामनकरनगर यवतमाळ) असे या महिलेचे नाव असून गुरुवारी दीपालीचा झोपेतच मृत्यू झाला, अशी माहिती तिचा पती महेश जनार्दन मिश्रा याने शेजारी तसेच नातेवाईकांना दिली. त्यानंतर दीपालीच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू झाली. 

दरम्यान हा प्रकार संशयास्पद असल्याने एका नागरिकाने डायल ११२ या क्रमांकावरून संपर्क करीत पोलिसांकडे शंका व्यक्त केली. यानंतर पोलिस निरीक्षक ज्ञानोबा देवकते यांनी पथकासह महेश मिश्रा याच्या घराकडे धाव घेतली. मात्र तेथे कोणीही आढळले नाही. अंत्ययात्रा स्मशानभूमीकडे गेल्याचे समजल्यानंतर  पोलिसांनी ही अंत्ययात्रा रस्त्यात थांबवून दीपालीचा मृतदेह ताब्यात घेतला होता. दीपालीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला,  हे तपासण्यासाठी वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली. त्यात दीपालीचा गळा आवळून मृत्यू झाल्याचे तसेच गळा आवल्यानंतर श्वसननलिका डॅमेज झाली होती, असा अहवाल आला. पोलिसांनी लगेच महेशला ताब्यात घेऊन विचारपूस केल्यानंतर किरकोळ भांडणातून पती महेशने दीपालीचा गळा आवळून खून केल्याचे उघड झाले. या प्रकरणी आजी रत्नकला शंकर तिवारी रा. वारज पो. तिवसा ता. दारव्हा यांच्या फिर्यादीवरून  महेश जनार्दन मिश्रा (२८) याच्याविरुद्ध कलम ३०२ भादंविनुसार गुन्हा नोंदविण्यात आला. 

म्हणे, खाटावरून पडल्याने दीपालीच्या कपाळाला लागले 
दीपालीचा मृत्यू झाला असा निरोप मिळाल्यानंतर ७४ वर्षीय आजी रत्नकला तिवारी या जामनकरनगर येथे नातीच्या घरी आल्या. तेथे महेश आणि त्याची दोन मुले दीपालीच्या प्रेताजवळ बसले होते. आजी रत्नकला यांनी महेशला दीपालीचा मृत्यू कसा झाला याबाबत विचारले असता महेश चाचपडत तिच्या छातीत दुखत होते, असे म्हणाला. त्याच्या बोलण्यावरून संशय बळावला. त्याचवेळी महेशची मावशी चंदा तिवारीसह पुष्पा चौधरी या दोघी तेथे आल्या. त्यांनीही महेशला हाच प्रश्न केला असता महेशने छातीत दुखल्यानेच मृत्यू झाल्याचे सांगितले. मात्र या तिघींनी दीपालीला शेवटची अंघोळ घातली त्यावेळी दीपालीच्या गळ्याला आणि कपाळाला काळा वर्ण दिसला. याबाबत विचारणा केली असता महेशने दीपाली खाटावरून पडल्याचे सांगितले. यावरून तिघींचा संशय अधिकच बळावला.
 

Web Title: Husband Mahesh killed Deepali by strangulation, autopsy revealed; After the complaint, the funeral procession was stopped on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.