ऑनलाईन शिक्षणाचा बोजवारा; ७१ हजार शाळांमध्ये इंटरनेट सुविधाच नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2021 07:14 AM2021-07-07T07:14:54+5:302021-07-07T07:17:53+5:30
देशभरातील प्रत्येक शाळेतील सुविधांची आकडेवारी केंद्रीय शिक्षण खात्याने गोळा केली. यू-डायस प्लस या प्रणालीत शाळांनीच भरलेल्या या आकडेवारीचा अहवाल केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी ट्विटद्वारे नुकताच जाहीर केला.
अविनाश साबापुरे -
यवतमाळ : कोरोनामुळे शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन शिक्षण सुरू असल्याचा दावा राज्याचा शालेय शिक्षण विभाग करीत आहे. प्रत्यक्षात महाराष्ट्रातील एक लाख शाळांपैकी ७१ हजार शाळांमध्ये इंटरनेट सुविधाच नसल्याची बाब यू-डायस प्लसच्या ताज्या अहवालातून पुढे आली आहे. त्यामुळे दीड वर्षांपासून शिक्षण विभाग ऑनलाईन शिक्षणाबाबत किती गंभीर आहे, हे दिसून येते.
देशभरातील प्रत्येक शाळेतील सुविधांची आकडेवारी केंद्रीय शिक्षण खात्याने गोळा केली. यू-डायस प्लस या प्रणालीत शाळांनीच भरलेल्या या आकडेवारीचा अहवाल केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी ट्विटद्वारे नुकताच जाहीर केला.
देशात १५ लाख शाळा आहेत. त्यापैकी फक्त ३ लाख ३५ हजार ८८२ शाळांमध्येच इंटरनेट सुविधा आहे. महाराष्ट्रात १ लाख १० हजार २२९ शाळांपैकी केवळ ३९ हजार १४ शाळांमध्ये इंटरनेट सुविधा उपलब्ध असून ऑनलाईन वर्ग सुरू आहेत. हे प्रमाण केवळ ३५.३९ टक्के आहे. ७१ हजार २१५ शाळांमध्ये इंटरनेटचा पत्ता नाही. गंभीर म्हणजे ३१ हजार ८९० शाळांमध्ये साधा संगणकही नाही. राज्यात ८९८ शाळा मान्यतेविनाच सुरू असून त्यापैकी ६२४ शाळा ऑनलाईन वर्ग घेतात.
शाळांमधील इंटरनेटची स्थिती -
शाळा इंटरनेट प्रमाण
देश १५,०७,७०८ ३,३५,८८२ २२.२८
महाराष्ट्र १,१०,२२९ ३९,०१४ ३५.३९
राज्यातील स्थिती -
प्रकार संख्या इंटरनेट
शासकीय ६५,८८६ ७,१४९
अनुदानित २३,७९१ १५,१२६
खासगी १९,६५४ १६,११५
अभ्यासक्रम फक्त होतो ‘फॉरवर्ड’
इंटरनेट सुविधा नसलेल्या शाळांचे ऑनलाईन वर्ग भरतच नाही. शिक्षण विभागाकडून आलेला अभ्यासक्रम शिक्षक ज्या पालकांकडे अँड्रॉईड फोन आहे, त्यांना व्हॉट्स ॲपवरून फक्त फॉरवर्ड करतात.