७५ वर्षांनी झालो साक्षर अन् आनंदात केले मतदान !
By अविनाश साबापुरे | Published: April 26, 2024 05:38 PM2024-04-26T17:38:55+5:302024-04-26T17:40:06+5:30
Yawatmal : ईव्हीएमचे बटण दाबताच वृद्ध शेतमजूर दाम्पत्याचे खुलले चेहरे
यवतमाळ : रोज शेतात जाणे.. दिवसभर काबाडकष्टात हरपून जाणे अन् रात्री जमिनीवर पडताच वेदना जोजवित झोपी जाणे... हाच त्यांचा दिनक्रम. ना दुनियेची खबर ना राजकीय घडामोडींची उत्सुकता. पण अर्धे-अधिक आयुष्य उलटून गेल्यावर यंदा पहिल्यांदाच त्यांना साक्षरतेचे धडे मिळाले. त्यात मतदानाची प्रक्रिया शिकविण्यात आली. त्यातून निवडणूक साक्षर झालेल्या या वृद्ध शेतमजूर दाम्पत्याने इव्हीएमचे बटण दाबले अन् स्वत:च हरखून गेले.
मतदानाचा हा आगळावेगळा आनंद पहिल्यांदाच अनुभवणाऱ्या दाम्पत्याचे नाव आहे मणिराम रामपुरे आणि सखूबाई रामपुरे. वयाची ७५ वर्षे त्यांनी अडाणी म्हणून व्यतीत केली. यवतमाळ तालुक्यातील कारली हे त्यांचे छोटेसे गाव. रोजमजुरी करून गुजराण करणे या पलिकडे त्यांना फारसे काही ठाऊक नव्हते. देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असताना त्यांच्या निरक्षरतेचाही अमृतमहोत्सव होऊन गेला. पण यंदा त्यांच्यासाठीही नव भारत साक्षरता मोहीम राबविण्यात आली. त्यात गावातील शिक्षकांनी त्यांची नोंदणी केली. काही महिने त्यांना साक्षरतेचे धडे देण्यात आले. त्यात पाठ्यपुस्तकातून मतदान प्रक्रियाही शिकविण्यात आली. अन् लगेच लोकसभेची निवडणूक आली. शुक्रवारी २६ एप्रिल रोजी यवतमाळ-वाशिम मतदारसंघाकरिता त्यांनी मतदान केले. गावातीलच शाळेच्या केंद्रात दोघेही पती-पत्नी पाहोचले अन् कुणाच्याही मदतीशिवाय यादीत स्वत:चे नाव शोधून त्यांनी ईव्हीएमवरील बटण ‘सोच समझकर’ दाबले. बटण दाबताच आपल्या ‘भारतीय नागरिकत्वा’चा जणू साक्षात्कार झाल्यागत ते आनंदून गेले. शाळेबाहेर आल्यावर शिक्षकांना भेटून त्यांनी मतदान केल्याची खूण दाखवित फोटो काढून घेतला. त्यावेळी मतदानाच्या आपल्या अधिकाराबाबत हे वृद्ध दाम्पत्य जे बोलले, ते ऐकून केंद्र प्रमुख स्वप्नील फुलमाळी हेदेखिल स्तब्ध झाले.
आम्ही आमचे कर्तव्य पार पाडले साहेब. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला मतदानाचा अधिकार दिला. त्या अधिकाराचा योग्य वापर करून प्रत्येकाने योग्य उमेदवार निवडून द्यावा.
- मणिराम रामपुरे, सखूबाई रामपुरे, प्रौढ असाक्षर, कारली (यवतमाळ)
आठ मतदारसंघात एक लाखावर प्राैढांचे मतदान
यवतमाळच्या मणिराम आणि सखूबाई रामपुरे या निरक्षर दाम्पत्याप्रमाणेच शुक्रवारी लोकसभेच्या आठही मतदारसंघात हजारो प्रौढ निरक्षरांनी पहिल्यांदाच ‘निवडणूक साक्षर’ होऊन मतदान केले. अमरावती मतदारसंघात २४ हजार ६५२, अकोलामध्ये १८ हजार ८८१, बुलढाणामध्ये ५ हजार २३३, यवतमाळ-वाशिममध्ये २६ हजार ९४८, वर्धामध्ये १ हजार ३६७, हिंगोलीत ८ हजार ७९४, नांदेडमध्ये १८ हजार ३९३, तर परभणी मतदारसंघात १४ हजार २२७ अशा एकंदर १ लाख १८ हजार ४९५ प्रौढ निरक्षरांना ‘निवडणूक साक्षर’ करण्यात आले आहे. त्यांच्यातील बहुतांश प्रौढांनी मतदान केले.