माझ्यासाठी भूमिहीन झालेल्या आई-वडिलांची स्वप्नपूर्ती

By admin | Published: April 9, 2016 02:38 AM2016-04-09T02:38:45+5:302016-04-09T02:38:45+5:30

माझ्या आई-वडिलांचे मी मोठा अधिकारी व्हावे हे स्वप्न होते. ते साकारण्यासाठी वडिलांनी आपली कोरडवाहू चार एकर जमीन विकली.

I have no dream of landless parents | माझ्यासाठी भूमिहीन झालेल्या आई-वडिलांची स्वप्नपूर्ती

माझ्यासाठी भूमिहीन झालेल्या आई-वडिलांची स्वप्नपूर्ती

Next

रवींद्र राठोड : उपजिल्हाधिकारी झालेल्या तरुणाने सांगितले यशाचे रहस्य, उमरखेडमध्ये जंगी स्वागत
अविनाश खंदारे उमरखेड
माझ्या आई-वडिलांचे मी मोठा अधिकारी व्हावे हे स्वप्न होते. ते साकारण्यासाठी वडिलांनी आपली कोरडवाहू चार एकर जमीन विकली. वडील माझ्यासाठी भूमिहीन झाले. आईने या काळात कठीण परिश्रम घेऊन मला सातत्याने प्रोत्साहन दिले. आई-वडिलांच्या स्वप्नांची मी पूर्तता केली याचा मला अभिमान आणि आनंद आहे, असे रवींद्र राठोड सांगत होता.
लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यातून दुसरा आलेला आणि उपजिल्हाधिकारी झालेला रवींद्र शंकर राठोड आपल्या मूळ गावी तालुक्यातील जनुना येथे शुक्रवारी आला. त्यावेळी तो ‘लोकमत’शी बोलत होता. यावेळी त्याने आपल्या यशाचे रहस्य सांगून कठोर परिश्रमाशिवाय कोणतेही यश मिळत नसल्याचे सांगितले. रवींद्र म्हणाला, मी दररोज १६ तास अभ्यास करीत होतो. कोणताही क्लास न लावता मी यश मिळविले. दर्जेदार पुस्तके, प्रश्नपत्रिका स्वत:च तयार करून सोडविणे आणि महत्वाचे म्हणजे तणावमुक्त अभ्यास या त्रिसूत्रीच्या आधारे यश मिळाल्याचे सांगितले. यावरच आपण थांबणार नसून अधिक परिश्रम घेऊन युपीएससीची तयारी करणार असल्याचे रवींद्र सांगतो.
पहिल्या वर्गापासूनच मला अभ्यासाची सवय होती. चिल्ली, जनुना, उमरखेड या तीनही ठिकाणी शिक्षण घेताना शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. गोपिकाबाई गावंडे महाविद्यालयात शिक्षण घेताना स्पर्धा परीक्षेची पुस्तके वाचण्यात आली आणि तेथून माझ्या मनात स्पर्धा परीक्षा देऊन मोठा अधिकारी होण्याचे स्वप्न फुलू लागले. आई-वडिलांचे, गावाचे आणि समाजाचे नाव मोठे करण्याची खूणगाठ मी मनाशी बांधली. आपले ध्येय गाठण्यासाठी पुण्यात पोहोचले. परंतु आर्थिक परिस्थितीमुळे कोणताही क्लास लावू शकलो नाही. स्वत:च अभ्यास करून परीक्षा देत गेलो. एक वेळ भोजन करून १६ तास अभ्यास करायचो. २०१४ मध्ये स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून मंत्रालयातील शिक्षण विभागात सहायक कक्ष अधिकारी म्हणून रुजू झालो. परंतु यात मन रमले नाही. नोकरी करतानाच लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी केली. दररोज सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत आॅफीस, त्यानंतर रात्री ११ वाजतापासून पहाटे ५ वाजेपर्यंत अभ्यास आणि ५ वाजता झोपलो की सकाळी ९ वाजता उठून मंत्रालय असा आपला दिनक्रम असल्याचे रवींद्र सांगत होता.
परीक्षेच्या तयारीसाठी संगणक, लॅपटॉप अशा सुविधा नव्हत्या. परंतु दिवसभर अभ्यास करणाऱ्या माझ्या मित्रांचे हे साहित्य मी रात्री वापरत होतो. अशा कठोर परिश्रमातून आपल्याला हे यश मिळाल्याचे रवींद्रने सांगितले.

मामाची मदत मोलाची
स्पर्धा परीक्षेच्या तयारीत मामाची मदत मोलाची झाली. त्यांच्या मदतीशिवाय मी हे यश मिळवूच शकलो नसतो, असे रवींद्र सांगतो. रवींद्रचे मामा संतोष जाधव, निरंजन जाधव, आजी पुतळाबाई जाधव यांनी रवींद्रला मोलाची आर्थिक मदत केली. यासोबतच माझ्या आई-वडिलांनी आणि इतरांनी केलेली मदत मी कधीच विसरु शकत नाही, असे सांगितले. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आपल्या परिसरातील मुले अधिकारी व्हावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे रवींद्र राठोडने सांगितले. \

Web Title: I have no dream of landless parents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.