माहूरच्या मुस्लीम समाजाचा आदर्श पायंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:35 AM2021-05-03T04:35:43+5:302021-05-03T04:35:43+5:30
फोटो माहूर : जात, पात, धर्म भेद बाजूला ठेवून कोरोना महामारीच्या काळात वसुधैव कुटुंबकंम या उक्तिनुसार माहूरच्या मुस्लीम समाजाने ...
फोटो
माहूर : जात, पात, धर्म भेद बाजूला ठेवून कोरोना महामारीच्या काळात वसुधैव कुटुंबकंम या उक्तिनुसार माहूरच्या मुस्लीम समाजाने आर्दश पायंडा पाडला आहे. समाजाने पवित्र रमजान महिन्यात जकातच्या रकमेतून सर्वधर्मीय गरीब व गरजू कुटुंबांना अन्नधान्याच्या किट्स व कोविड केअर सेंटरला कूलर भेट दिले आहे.
येथील मुस्लीम बांधवानी समाजात आदर्श पायंडा पाडल्याचे मत तहसीलदार राकेश गिड्डे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र दिनी येथील जामा मशीद कमिटीकडून गरजूंना अन्नधान्य व कोविड केअर सेंटरला कूलर भेट देण्यात आले. छोटेखानी कार्यक्रमात ही मदत देण्यात आली. अध्यक्षस्थानी तहसीलदार राकेश गिड्डे होते. गटविकास अधिकारी युवराज म्हेत्रे, पोलीस निरीक्षक नामदेव रिठे, बाल विकास प्रकल्प अधिकारी विशाल सिंह चौहान, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एस.बी. भिसे, डॉ.अभिजीत आंबेकर, मंडळ अधिकारी पडकोंडे, बाबुलाल जैस्वाल, नंदू संतान यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी तहसीलदार गिड्डे यांनी माहूर शहरातील तमाम जनता शांतता प्रिय असून, मुस्लीम धर्मीयांनी गतवर्षीही मालेगाव काढा, इम्युनिटी बूस्टर वाढविणाऱ्या होमिओपॅथीच्या अल्बम थर्टी गोळ्या व अन्नधान्य वाटप केले होते, याची आठवण काढली. या वर्षीही तसाच उपक्रम राबवून मुस्लीम समाजाने जिल्ह्यात नव्हे, तर देशात सकारात्मक संदेश दिल्याचे सांगितले. गटविकास अधिकारी म्हेत्रे यांनी कोरोनाच्या संकटाचा सामना एकोप्याने करण्याची गरज असून, एकत्र आले, तर या रोगाचे यथा शीघ्र समूळ उच्चाटन करता येईल, असा विश्वास व्यक्त केला. विचारांची एकता असल्यास यावर नक्कीच मात करता येईल. त्यामुळे नागरिकांनी स्वतःचे आरोग्य जपावे, शासनाच्या त्रिसूत्रीचे पालन करावे, असे आवाहन केले.
विशाल सिंह चौहान यांनी लसीकरण करण्याचे आवाहन केले.
प्रास्ताविकात जमातचे आमिर आरीफ बावानी यांनी प्रशासनाला प्रत्येक संभाव्य मदत करण्याचे आश्वासन देत, ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर भेट देण्यासाठी सकारात्मकता दाखविली. संचालन साजिद खान, तर आभार माजी नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी मानले. यावेळी हाजी उस्मान खान चांद खान, बाबू खा फारुकी, हाजी रऊफ सेठ सौदागर, नगरसेवक रहेमत आली, रफिक सौदागर, इकबाल फाजलानी, जामा मशीदचे सदर नासिर सौदागर, रफिक भाई झमझम यांची उपस्थिती होती. प्रशासनाच्या वतीने तहसीलदार व इतर मान्यवरांनी जमातचे आमीर आरीफ बावानी यांचा सत्कार करून आभार मानले.