साहित्य संमेलनातील ‘टॉक शो; माध्यमांनी बांधीलकी आणि जबाबदारी ओळखावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 09:40 PM2019-01-12T21:40:32+5:302019-01-12T21:41:41+5:30
स्वायत्तता उपभोगायची असेल तर माध्यमांनी आपली बांधीलकी आणि जबाबदारी ओळखून काम केले पाहिजे, असे रोखठोक मत नितीन केळकर यांनी शनिवारी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील ‘टॉक शो’ या कार्यक्रमात मांडले.
अविनाश साबापुरे
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरी) : स्वायत्तता उपभोगायची असेल तर माध्यमांनी आपली बांधीलकी आणि जबाबदारी ओळखून काम केले पाहिजे, असे रोखठोक मत नितीन केळकर यांनी शनिवारी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील ‘टॉक शो’ या कार्यक्रमात मांडले.
संमेलनाच्या उद्घाटक नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द केल्यामुळे ‘टॉक शो’ या कार्यक्रमातील बहुतांश निमंत्रित पाहुण्यांनी बहिष्कार टाकला. ‘माध्यमांची स्वायत्तता : नेमकी कोणाची?’ असा या चर्चासत्राचा विषय होता. त्यासाठी गिरीश कुबेर, नितीन केळकर, ज्ञानेश महाराव, प्रा. जयदेव डोळे हे निमंत्रित होते. पण यापैकी केळकर वगळता सर्वांनी बहिष्कार टाकला. तर कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून संजय आवटे यांनाही निमंत्रित करण्यात आले होते. त्यांनीही बहिष्कार टाकला.
त्यामुळे नितीन केळकर यांच्या सोबतीला ऐनवेळी कवयित्री अपर्णा मोहिले यांना कार्यक्रमात सहभागी करण्यात आले. तर समन्वयकाची जबाबदारी ‘लोकमत’चे भंडारा जिल्हा प्रतिनिधी ज्ञानेश्वर मुंदे यांनी पार पाडली. यावेळी नितीन केळकर म्हणाले, ज्यांनी बहिष्कार टाकला ते अवघ्या चार दिवसात व्हीसा मिळवून क्वालालंपूरच्या संमेलनाला कसे जाऊ शकतात? माहिती मिळविणे हा प्रत्येकाचा मुलभूत अधिकार आहे. माध्यमांना विशेषाधिकार हवेत तरी कशाला? जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य राज्यघटनेनुसार सर्वच नागरिकांना आहे, तेच माध्यमांनाही आहे. आजचे वार्ताहर, संपादक हे पूर्वी प्रमाणे नाहीत. त्यांच्या हातून माध्यमे सुटत जाऊन मालकांच्या हाती गेली आहेत. अनेक वाहिन्या राजकीय नेत्यांच्या आणि उद्योगपतींच्या हाती आहे. या वाहिन्यांमध्ये कोणाची किती गुंतवणूक याची माहिती जनतेला मिळाली पाहिजे. निवडणुकीत पेड न्यूज देणाऱ्यांना स्वायत्तता देऊन उपयोग काय? असा सवालही त्यांनी केला.
मात्र आज आलेल्या सोशल मीडियामुळे माध्यमांना स्वायत्तता देण्याची गरजच नाही, ती आहेच. सोशल मीडियामुळे प्रत्येक नागरिकच माध्यमकर्मी झाला आहे. त्यामुळे आजच्या काळात ‘गांधीजींची तीन बंदरे व्हा’ असा सल्ला देण्यात उपयोग नाही. त्यापेक्षा जे समोर आले ते वाचा, ऐका, बघा. फक्त वाचताना रिकाम्या जागाही वाचा. ऐकताना मौनाचाही अर्थ समजून घ्या. बघताना दाखवायचे काय टाळण्यात आले त्याचा शोध घ्या. तेव्हाच माध्यमांची स्वायत्तता सर्वांच्या उपयोगाची होईल. दोन्ही बाजू मांडणे हे माध्यमांचे कर्तव्य आहे, याचेही भान असले पाहिजे.
बायको हीच पहिली सेन्सॉर!
सेन्सॉरमध्ये कामाचा अनुभव असलेल्या कवयित्री अपर्णा मोहिले यांना ऐनवेळी या ‘टॉक शो’मध्ये सहभागी करण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी गंभीर वातावरणाला हलके करण्याचा प्रयत्न केला. स्वायत्तता केवळ माध्यमांचीच नव्हेतर प्रत्येक व्यक्तीचीही महत्त्वाची बाब आहे. पण स्वायत्ततेचा गैरवापर होणार नाही, यासाठी सेन्सॉरशिपही गरजेची आहे. त्यादृष्टीने बायको ही प्रत्येक पुरुषाची पहिली सेन्सॉर असते. संस्थेचा विचार केला, तर प्रत्येक संस्थेचे स्वत:चे नियम असतात. शिस्त असते. त्या शिस्तीत वागण्याचे बंधन घातले म्हणजे स्वायत्तता धोक्यात आली, असे म्हणणे चुकीचे आहे. माणसाने अन्यायाच्या मार्गावरून पुढे जावे म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळाले आहे. त्याचा गैरवापर होता कामा नये. पण सेन्सॉर बोर्डाच्या कात्रीला अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली विरोध केला जातो. त्यामुळे ती जपून वापरली पाहिजे. सेन्सॉरची कात्री आणि न्हाव्याची कात्री चुकली तर रक्तपात होतो, अशा हलक्याफुलक्या शैलीत मोहिले यांनी आपले मत मांडले.