वाहनचालक चुकले तर, फाडणार ई-चालान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 10:08 PM2019-04-30T22:08:16+5:302019-04-30T22:08:39+5:30
रस्त्यावर धावताना वाहनचालक अनेकदा नियम मोडतात. त्यांना पकडून वाहतूक पोलीस दंड ठोठावतात. चालान फाडतात. मात्र, एक मे महाराष्ट्र दिनापासून हे कागदी चालान बंद होऊन ई-चालान फाडले जाणार आहे. त्यामुळे मनमानी दंड आकारणीला चाप बसणार असून वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांची जरब वाढणार आहे.
रूपेश उत्तरवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : रस्त्यावर धावताना वाहनचालक अनेकदा नियम मोडतात. त्यांना पकडून वाहतूक पोलीस दंड ठोठावतात. चालान फाडतात. मात्र, एक मे महाराष्ट्र दिनापासून हे कागदी चालान बंद होऊन ई-चालान फाडले जाणार आहे. त्यामुळे मनमानी दंड आकारणीला चाप बसणार असून वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांची जरब वाढणार आहे.
वाहतूक शाखेचा कारभार पारदर्शक व्हावा म्हणून यापूर्वीच काही जिल्ह्यात ‘एक राज्य एक ई-चालान’ प्रणालीद्वारे वाहतूक शाखा स्मार्ट झाल्या होत्या. मात्र यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यातील अंमलबजावणी खोळंबली होती. आता १ मेपासून या दोन जिल्ह्यातही नव्या प्रणालीचा अवलंब होणार आहे. राज्याच्या गृह शाखेने त्यासंदर्भातील पत्र वाहतूक शाखेला पाठविले असून कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे.
या प्रणालीसाठी एमस्वाईप मशिन पुरविण्यात आल्या आहेत. मोबाईलसारखी ही मशिन असणार आहे. त्याला ब्लूटूथने प्रिंटर अटॅच असेल. या पद्धतीमुळे चोरीचे वाहन, चालकाचा परवाना यांची माहितीही तत्काळ मिळणार आहे. दंडाची रक्कम थेट अपर पोलीस महासंचालकाच्या वाहतूक शाखेकडे जमा होणार आहे. तेथून ही रक्कम जिल्हा शाखेच्या खात्यात वळती होणार आहे.
वाहतुकीला शिस्त लावताना वाहनांवर विविध नियमानुसार दंड आकारला जातो. अनेकदा हा दंड अवास्तव असल्याची ओरड होते. दंडाची रक्कम पोलीस खात्यात गेली की पोलिसाच्या खिशात, याबाबतही संशय व्यक्त केला जातो. त्यामुळे पारदर्शकता आणण्यासाठी ई-चालान पद्धती वापरली जाणार आहे.
फाडलेल्या चालानवर शासकीय नियमानुसार दंडाची रक्कम राहणार आहे. ती रक्कम अपर पोलीस महासंचालकांच्या वाहतूक शाखेला तत्काळ नोंदविली जाणार आहे. त्याचे स्वतंत्र सॉफ्टवेअर आहे. प्रसंगी डेबिट कार्डवरून रक्कम वळती करता येणार आहे. ज्याने दंड भरला, त्याला अधिकृत पावती दिली जाणार आहे. त्यामुळे भ्रष्टाचार होण्यास वाव
नाही.
परवानाधारकाचा तपशिल कळेल
या प्रणालीला आरटीओ आणि पोलीस खात्याशी जोडण्यात आले आहे. यामुळे एखादे वाहन पकडले, तर ते वाहन यापूर्वी कुठल्या गुन्ह्यात वापरले गेले होते काय, चालकावर गुन्हे आहेत काय, याची संपूर्ण माहिती उपलब्ध होणार आहे.
जिल्ह्याकरिता ४३ एमस्वाईप मशिन पुरविण्यात आल्या आहेत. त्या माध्यमातून १ मेपासून ई-चालान फाडले जाणार आहे. त्या दृष्टीने पोलिसांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.
- आकाश चव्हाण
ई-चालान जिल्हा समन्वयक, यवतमाळ