तर देशाची प्रगती कोणी रोखू शकणार नाही
By admin | Published: April 8, 2017 12:13 AM2017-04-08T00:13:17+5:302017-04-08T00:13:17+5:30
संस्कारांना कृतीत उतरविले की संस्कृती बनते. आपल्या सकारात्मक संस्कृतीतून देशातील प्रत्येक नागरिक एका परिवारासारखे
मुज्जफर हुसैन : शंकरराव सरनाईक वाचनालयात चैत्र महोत्सव
पुसद : संस्कारांना कृतीत उतरविले की संस्कृती बनते. आपल्या सकारात्मक संस्कृतीतून देशातील प्रत्येक नागरिक एका परिवारासारखे राहिल्यास भारताची प्रगती कोणीही रोखू शकत नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार पद्मश्री मुज्जफर हुसैन यांनी येथे केले.
देशभक्त शंकरराव सरनाईक सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने चैत्र महोत्सवाअंतर्गत आयोजित रमेश जयस्वाल स्मृती ‘भारतीय संस्कृती : काल, आज आणि उद्या’ या विषयावर ते बोलत होते. ते म्हणाले, संस्कार कृतीत येतात तेव्हा संस्कृती बनते. शासनाचे काम, उद्देश व नीती ही त्या देशाची संस्कृती ठरते. अमेरिकेच्या ट्रम्प सरकारने काश्मीरबाबत भारत हिताची मांडलेली भूमिका भारताला बळ देणारी आहे. त्यामुळे ट्रम्प संस्कृती भारत सरकारसाठी सकारात्मक झाली. उलट पाकिस्तानसाठी नकारात्मक. सध्याच्या सरकारमुळे जगात भारताची दखल घेतली जात आहे. स्वातंत्र्यानंतर केवळ इंदिरा गांधी व आताचे नरेंद्र मोदी या दोन पंतप्रधानांमुळे भारताची बाह्य ताकद वाढल्याचे त्यांनी सांगितले. विद्यमान सरकारने अंतर्गत राजकारणात वेळ घालविण्यापेक्षा अर्थव्यवस्थेला सुदृढ करण्यावर भर देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
वाचनालयाचे अध्यक्ष योगेश राजे यांनी मुज्जफर हुसैन यांचा सत्कार केला. परिचय उपाध्यक्ष अनघा गडम यांनी, संचालन मनीष अनंतवार यांनी तर आभार सहसचिव अजय क्षीरसागर यांनी मानले. यावेळी माजी आमदार विजय पाटील चोंढीकर, डॉ.उत्तम रुद्रवार, दीपक आसेगावकर, शंतनू रिठे, अश्विन जयस्वाल उपस्थित होते. वाचनालयाचे सचिव चंद्रकांत गजबी, कोषाध्यक्ष रवी देशपांडे, सदस्य आशीष देशमुख, विजय उबाळे, अॅड.विनोद पाटील, डॉ.उमेश रेवणवार, स्मिता वाळले, सुनीता तगडपल्लेवार, ग्रंथपाल नागेश गांधे यांनी परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)