शौचालय नसेल तर किराणा नाही; यवतमाळ जिल्ह्यातल्या व्यावसायिकाची शक्कल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 11:17 AM2017-12-20T11:17:29+5:302017-12-20T11:18:36+5:30
स्वच्छ भारत मिशनअंतर्गत घर तेथे शौचालय अभियान राबविले जात आहे. गावातील स्वच्छता व सुंदरता वाढावी यासाठी पाथ्रड गोळे येथील किराणा व्यावसायिकाने अनोखी शक्कल लढविली आहे. घरी शौचालय नसेल तर किराणाच मिळणार नाही, अशी अट त्याने घातली आहे.
आॅनलाईन लोकमत
यवतमाळ : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत घर तेथे शौचालय अभियान राबविले जात आहे. गावातील स्वच्छता व सुंदरता वाढावी यासाठी पाथ्रड गोळे येथील किराणा व्यावसायिकाने अनोखी शक्कल लढविली आहे. घरी शौचालय नसेल तर किराणाच मिळणार नाही, अशी अट त्याने घातली आहे.
पाथ्रड गोळे गाव हागणदारीमुक्तीसाठी सर्वांनीच पुढाकार घेतला आहे. या मोहिमेत आपलाही हातभार लागावा म्हणून गावातील किराणा व्यावसायिक रामकृष्ण सावळे यांनी दुकानात फलक लावून ज्यांच्याकडे शौचालय नाही त्यांना किराणा मिळणार नाही, असे जाहीर केले आहे. गावात ज्यांची आर्थिक स्थिती नाही अशा कुटुंबांना शौचालयाची सिट व तीन बॅग सिमेंट विनामूल्य दिले जात. आतापर्यंत या गावात ४०० शौचालय झाले असून काही कुटुंबातील व्यक्ती घरात शौचालय असतानाही उघड्यावर जातात. यासाठी जागृतीचे काम मुख्यमंत्रीदूत किरण घोरपडे, सरपंच, रवी गावंडे, हनुमान अडमाते, ग्रामसेवक सहारे हे गूड मॉर्निंग पथकाच्या माध्यमातून हागणदारीमुक्ती अभियान राबवित आहे. यातच रामकृष्ण सावळे यांच्या अफलातून निर्णयाने गावातील हागणदारीमुक्तीला चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे.
पंचायत समितीच्या सभापती मनीषा गोळे या येथील असल्यानेच प्रशासकीय यंत्रणेकडूनही स्वच्छता अभियानासाठी विशेष परिश्रम घेतले जात आहे. सध्या तरी गावात किराणा व्यावसायिकाने लावलेल्या फलकाची चर्चा रंगली आहे.