नरकात जायचं नसेल तर कट्टर हिंदुत्त्वादी नेत्यांना निवडून द्या; कालीचरण पुन्हा बरळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2023 08:09 PM2023-01-21T20:09:36+5:302023-01-21T20:18:17+5:30
जिल्ह्यातील पुसद शहरात आज हजारो नागरिकांच्या उपस्थितीत हिंदू गर्जना मोर्चा काढण्यात आला आहे.
यवतमाळ - महात्मा गांधींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर चर्चेत आलेल्या कालिचरण महाराजांच्या नेतृत्वात आज यवतमाळमध्ये मोठा मोर्चा काढण्यात आला. यवतमाळ जिल्ह्यातील पुसदमध्ये आज हिंदू गर्जना मोर्चा काढण्यात आला. कालिचरण महाराजांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं. यावेळी, बोलताना कट्टर हिंदुत्त्ववादी नेत्यांनाच निवडून देण्याचं आवाहन कालीचरण यांनी केलं. आपल्या भाषणात पुन्हा एकदा त्यांनी धार्मिक मुद्द्यावरुन आक्रमपणा दाखवला. तसेच, भाषावाद आणि जातीवाद खल्लास झाला पाहिजे, असेही त्यांनी म्हटले.
जिल्ह्यातील पुसद शहरात आज हजारो नागरिकांच्या उपस्थितीत हिंदू गर्जना मोर्चा काढण्यात आला आहे. लव्ह जिहाद, धर्मांतरण, गोहत्या रोखण्यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाला कालीचरण यांनी संबोधित केले. ते म्हणाले की, प्रांतवाद, भाषावाद, जातीवाद खल्लास झाला पाहिजे, अन्यथा धर्म खल्लास होईल. धर्म खल्लास झाल्यास 12 हजार वर्षांसाठी तुम्ही नरकात जाणार, असेही कालीचरण यांनी म्हटले. धर्माच रक्षण करणं गरजेच आहे. नरकात जायचे नसेल तर वोटर बँक बनून कट्टर हिंदुत्ववादी नेत्यांना निवडून देण्याचे आवाहनही कालीचरण यांनी यावेळी केले. यापूर्वीही कालीचरण यांनी वादग्रस्त विधानं करुन सर्वाचं लक्ष वेधलं होतं. हरीद्वार येथील धर्म संसदेत त्यांनी महात्मा गांधींच्या हत्येसंदर्भात विधान करताना नथुराम गोडसेचं समर्थन केलं होतं.
दरम्यान, पुसद येथील शिवाजी चौक परिसरातून हा मोर्चा निघाला. आमदार निलेश नाईक यांनीही मोर्चात सहभाग नोंदवला. श्रीराम चंद्राच्या कृपेने सकल हिंदु समाजाने हा मोर्चा काढल्याची प्रतिक्रिया निलेश नाईक यांनी दिली. गोवंश हत्या बंदी, लव्ह जिहाद तसेच धर्मांतराच्या विरुद्ध आम्ही रस्त्यावर उतरलो, असल्याचं निलेश नाईक यांनी म्हटलं.