पैसा आला तरी मिळेना पुस्तक
By admin | Published: May 5, 2017 02:10 AM2017-05-05T02:10:00+5:302017-05-05T02:10:00+5:30
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या बोलीभाषेतून सुलभपणे शिक्षण मिळावे यासाठी द्विभाषिक पुस्तकांची रचना करण्यात आली
शिक्षक बदल्या, सुट्यात मग्न : द्विभाषिक पुस्तकांवर दुर्लक्ष
यवतमाळ : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या बोलीभाषेतून सुलभपणे शिक्षण मिळावे यासाठी द्विभाषिक पुस्तकांची रचना करण्यात आली. विशेष म्हणजे, ही पुस्तके घेण्यासाठी प्रत्येक शाळेला दोन महिन्यांपूर्वीच निधीही देण्यात आला. पण उन्हाळी सुट्ट्या लागल्या तरी शाळांनी द्विभाषिक पुस्तकेच खरेदी न केल्याची गंभीर बाब पुढे आली आहे.
जिल्हा परिषदेच्या दोन हजारांवर शाळांपैकी केवळ १८९ शाळांनी पुस्तक खरेदी केल्याचा अहवाल प्रशासनाला दिला आहे. उर्वरित शाळांनी मात्र हात झटकले आहेत. त्यामुळे ५ मेपर्यंत पुस्तके खरेदी न केल्यास संबंधित गटशिक्षणाधिकाऱ्यालाच पुण्याच्या विद्यापरिषदेत खुलासा देण्यासाठी जावे लागणार आहे. परंतु, शिक्षणाधिकाऱ्यांनी तंबी दिल्यानंतरही खरेदी होत नसल्याने अखेर बीईओंनी आता केंद्रप्रमुखांकडून खुलासे मागविले आहेत.
प्रत्येक शाळेत द्विभाषिक पुस्तके उपलब्ध व्हावी यासाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद गेल्या दोन महिन्यांपासून प्रयत्नरत आहे. पण जिल्हा परिषदेचे शिक्षक सध्या विषय शिक्षक भरती, बदल्यांचे राजकारण आणि उन्हाळी सुट्ट्यांचे वेध यातच रममाण आहेत. सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून द्विभाषिक पुस्तके घेण्यासाठी प्रत्येक शाळेला निधी दिला गेला. विशेष म्हणजे, कोणत्या वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी कोणती पुस्तके खरेदी करावी, यासाठी विद्या प्राधिकरणाकडून खास पुस्तकांची यादीही प्रकाशित करण्यात आली. ही पुस्तके मुख्याध्यापकांनी ३१ मार्चपर्यंत खरेदी करण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु, ३१ मार्च उलटल्यावरही शाळांनी द्विभाषिक पुस्तकांची खरेदीच केली नाही.
३१ मार्चपर्यंत केवळ पुस्तकेच खरेदी करायची नव्हती, तर खरेदी केल्याचा अहवालही महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेला आॅनलाईन द्यायचा होता. मात्र, या कामात जिल्ह्यातील शाळांनी हयगय केल्याची बाब पुढे आली आहे. आता यासंदर्भात गटशिक्षणाधिकाऱ्यांनी केंद्रप्रमुखांकडून खुलासे मागविण्यास सुरूवात केली. (स्थानिक प्रतिनिधी)
चार तालुक्यांतून शून्य खरेदी
जिल्ह्यात आतापर्यंत वणी तालुक्यातील केवळ एका शाळेने द्विभाषिक पुस्तके खरेदी केली. आर्णीतील १७, पुसद १, दिग्रस १०, नेर २५, बाभूळगाव ३, कळंब १९, मारेगाव १, झरी १८, पांढरकवडा ३२, यवतमाळ ३६, तर महागाव तालुक्यातील २६ शाळांनी पुस्तके घेतल्याचा अहवाल दिला. मात्र, घाटंजी, दारव्हा, राळेगाव आणि उमरखेड या चार तालुक्यांनी मे महिना उजाडूनही द्विभाषिक पुस्तकांसाठी धडपड केली नाही.