रेबिजचं इंजेक्शन घेतलंय, तर मग करू नका वर्षभर रक्तदान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 06:35 PM2024-07-27T18:35:07+5:302024-07-27T18:36:34+5:30
पुढचा धोका टळेल : दुर्धर आजार असणाऱ्यांनीही टाळावे रक्तदान
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : अनेकजण अजानतेपणी आपण स्वतः एखाद्या आजाराने ग्रस्त असतानाही किंवा आजाराबाबत औषधी सुरू असतानाही थेट रक्तदानासाठी जातात. याचा दुष्परिणाम त्या व्यक्तीच्या शरीरावर होण्याचा धोका असतो. ज्यांना कुत्रा चावला व त्यांनी रेबिजचे इंजेक्शन घेतले अशांनी वर्षभर रक्तदान करू नये. जेणेकरून पुढचा धोका होणार नाही.
काहीजण उत्साहाच्या भरात आपले आजार सुरू असलेल्या औषधोपचाराची माहिती रक्तदान करताना सांगण्याचे टाळतात. मात्र अशा व्यक्तीने रक्तदान केल्यास त्यालाच धोका निर्माण होण्याची शक्यता असते. मधुमेह असणाऱ्या व्यक्तीने रक्तदान केल्यास हायपोग्लायसिमिया होण्याची भीती आहे. हृदयरोग असणाऱ्या व्यक्तींना श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. त्यामुळे अशा व्यक्तींना कायम प्रतिबंध करण्यात आला आहे, तर रेबिज व इतर कुठल्या लसी घेतलेल्या व्यक्तीने किमान वर्षभर रक्तदान करू नये. जेणेकरून शारीरिक स्वास्थ्यावर परिणाम होणार नाही. जी व्यक्ती धडधाकट आहे. तिला कुठलाही आजार नाही, औषधी सुरू नाही अशा व्यक्तीने आवर्जून रक्तदान करावे. त्यांना आणखी चांगले आरोग्य मिळते, शिवाय गरजूंना रक्त देऊन त्यांची मदत केल्याचे समाधान लाभते.
रक्तदान करताना उत्तम आरोग्य महत्त्वाचे
रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. रक्ताच्या एका बॅगपासून तीन रक्त घटक तयार होतात. सोबतच रक्तदान केल्याने नवीन पेशी तयार होते. हृदयरोग, रक्तदाब या आजारांची शक्यताही रक्तदात्यासाठी कमी होत जाते.
रक्तदान करण्यापूर्वी हे लक्षात असू द्या
- तीन दिवस अगोदर प्रतिजैविकं घेतलेली नकोत
- गत तीन महिन्यांत मलेरिया झालेला नको
- वर्षभरात कावीळ, विषमज्वर झालेला नको
- रिक्रिएशनल, अंमली पदार्थांचे सेवन नको
- गत वर्षभरात श्वानदेश झालेला नको
- गत वर्षभरात रेबीजची लस घेतलेली नको
- रक्तदान करण्याआधी १५ दिवस आधी, कॉलरा, टायफाइड, प्लेगची लस घेतलेली असायला नको
या व्यक्तींना करता नाही येत रक्तदान
ज्यांना सिकलसेल ब्लड कॅन्सर, एचआयव्ही, मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग असे आजार आहेत, त्या व्यक्तींनी रक्तदान करू नये, असे केल्यास त्याचा दुष्परिणाम रक्तदात्यावरच होण्याची शक्यता अधिक आहे.
१८ ते ६० वर्षे स्वेच्छेने करू शकाल रक्तदान
- शारीरिक तंदुरुस्ती असणाऱ्यांनी वर्षातून तिनदा आवर्जून रक्तदान करावे. याचा फायदा स्वतःच्या शरीरावरही होतो.
- रक्तदान केल्याने रुग्णाला जीवनदान दिल्याचे समाधान मिळते. त्यामुळे रक्तदान हेच सर्वात श्रेष्ठदान असल्याचे मानले जात आहे.
एचबी किमान १२.५; वजन हवे ४५ किलोच्या पुढे
रवत्तदान करण्यासाठी काही पात्रता ठरविण्यात आल्या आहेत. दात्याच्या शरीरात हिमोग्लोबीनचे प्रमाण १२.५ असणे आवश्यक आहे, तसेच या व्यक्तीचे वजनही किमान ४५ किलोच्या पुढे असेल, तरच रक्तदान करता येते. रक्तदान केल्याचा शरीरावर चांगला परिणाम होतो. त्यामुळे तरुणांनी पुढे यायला हवे.
गर्भवतींना रक्तदान करता येते का?
गर्भवती महिलांनी कुठल्याही परिस्थितीत रक्तदान करू नये. गर्भाची वाढ होत असताना, महिलांच्या शरीरातच पुरेशा रक्ताची गरज भासते. अशात रक्तदान केल्यामुळे गर्भावर परिणाम होऊ शकतो.
दर चार महिन्यांनी करता येईल रक्तदान
एकदा रक्तदान केल्यानंतर किमान चार महिने रक्तदान करणे टाळावे. या कालावधीत शरीरात रक्ताचे प्रमाण संतुलित होते. चार महिन्यांनंतर पुन्हा रक्तदान करणे सुरक्षित ठरते.
"रक्तदान करून आपण थेट जीवनदान करण्याचे काम करतो. रक्त पिशवीतून तीन घटक वेगळे केले जातात. त्यामुळे एका दात्याच्या रक्तापासून तीन रुग्णांना रक्ताचा लाभ होतो. प्रत्येकानेच स्वयंस्फूर्तीने रक्तदानासाठी पुढे यावे."
- डॉ. विशाल नरोटे, सहायक प्राध्यापक.