यवतमाळ वनविभागातील आयएफएस अभर्णा, ‘ना खाऊंगी ना खाने दूंगी’ ; भ्रष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 11:31 AM2017-12-02T11:31:44+5:302017-12-02T11:34:37+5:30
थेट भारतीय वनसेवेच्या अधिकारी असलेल्या के. अभर्णा या महिला अधिकाऱ्याने ‘ना खाऊंगी-ना खाने दुंगी’ या आपल्या ‘स्टाईल’ने कामकाज सुरू केल्याने पांढरकवडा वनविभागातील काही भ्रष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
राजेश निस्ताने ।
आॅनलाईन लोकमत
यवतमाळ : थेट भारतीय वनसेवेच्या अधिकारी असलेल्या के. अभर्णा या महिला अधिकाऱ्याने ‘ना खाऊंगी-ना खाने दुंगी’ या आपल्या ‘स्टाईल’ने कामकाज सुरू केल्याने पांढरकवडा वनविभागातील काही भ्रष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. ‘दुकानदारी’च बंद झाल्याने या अधिकाऱ्यांनी आता सदर महिला अधिकाऱ्याला वेगळे पाडण्यासाठी आपली लॉबिंग सुरू केली असून त्याला यवतमाळातूनही भक्कम साथ मिळत असल्याचे सांगितले जाते.
पांढरकवडा वन विभागाला के. अभर्णा यांच्या रुपाने थेट आयएफएस असलेल्या अधिकारी सलग लाभल्या आहेत. त्यांची यापूर्वीची सेवा आसाममधील देशातील सर्वात मोठ्या काझीरंगा अभयारण्यात झाली आहे. त्या तुलनेत पांढरकवड्यातील आव्हान त्यांच्यापुढे अगदीच छोटे आहे. के. अभर्णा यांनी ‘ना खाऊंगी-ना खाने दुंगी’ या आपल्या पध्दतीने पांढरकवडा वन विभागातही कामाचा सपाटा लावला आहे. त्यामुळे वन अधिकाऱ्यांच्या परंपरागत भ्रष्टाचाराला ब्रेक लागला आहे. दुर्मिळ वन्य प्राण्यांच्या शिकारी, सागवानाची अवैध वृक्षतोड या सारख्या गैरप्रकारांना चाप बसला आहे. त्यामुळे अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली असून त्यांनी आता आपला वेगळा गट बनवून आव्हान उभे करण्याचा प्रयत्न चालविला आहे.
पाच वर्षांपासून पांढरकवड्यात तळ
वन प्रशासनाची दिशाभूल करून पोलिसांना जंगल फिरविणारा एक वनअधिकारी गेल्या चार-पाच वर्षांपासून पांढरकवड्यात तळ ठोकून आहे. पुढील दोन महिन्यात ते सेवानिवृत्त होणार आहेत. काँग्रेसच्या एका दिवंगत नेत्याशी असलेल्या नातेसंबंधाच्या बळावर या अधिकाऱ्याने गेल्या वर्षी पांढरकवड्यात मुदतवाढ मिळविली होती. आताही सत्ताधारी भाजपाच्या आर्णी व राळेगावातील आमदारांची मर्जी सांभाळून सेवानिवृत्तीनंतर पुन्हा सेवेत राहण्याचा लाभ मिळविण्याच्या दृष्टीने मोर्चेबांधणी सुरू असल्याचे सांगितले जाते.
नुकसानभरपाई धनादेश विलंबाने
वाघाने हल्ला केल्याच्या प्रकरणात मृताच्या नातेवाईकांना नुकसानभरपाईचे धनादेश तातडीने देण्याचे आदेश आयएफएस अभर्णा यांनी दिले होते. मात्र वेगवेगळी कारणे पुढे करून तब्बल दीड महिना विलंबाने हे धनादेश सुपूर्द करण्यात आले. त्याचे श्रेय आमदारांना मिळावे म्हणून धनादेश वाटपाचा हा कार्यक्रम कालपर्यंत लांबणीवर टाकला गेला. एरव्ही वाघाने हल्ला करूनही मृताच्या घरी भेटी देण्याची फारशी तसदी न घेणारे वरिष्ठसुद्धा गुरुवारी झालेल्या धनादेश वितरण कार्यक्रमाला आवर्जुन उपस्थित होते. या कार्यक्रमाला आयएफएस अभर्णा मात्र अनुपस्थित होत्या.
बोगस व्हाऊचर, रॉयल्टीला चाप
के. अभर्णा यांच्या ‘ना खाऊंगी-ना खाने दुंगी’ या कारभारामुळे पांढरकवडा वन विभागातील भ्रष्टाचार बराच कमी झाला आहे. त्यांनी चुकीच्या पद्धतींना, बोगस व्हाऊचरद्वारे पैसे काढण्याच्या प्रकाराला, रॉयल्टी पॅटर्नला चाप लावला आहे. त्यांनी वन खात्याला शिस्त लावली. त्या स्वत:ही दिवसा आणि रात्रीसुद्धा अचानक जंगलात गस्तीसाठी निघतात. त्यामुळे वन खात्यातील भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांची लॉबी अस्वस्थ आहे. या लॉबीने आता आपला वेगळा गट स्थापन केला आहे. त्यातून ‘आयएफएस’ला वेगळे पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचे वन वर्तुळात बोलले जाते. या प्रयत्नांना यवतमाळातूनसुद्धा भक्कम साथ मिळत असल्याचीही चर्चा आहे.
वाघाच्या हल्ल्याचा सूक्ष्म अभ्यास
के. अभर्णा यांच्या अभ्यासपूर्ण व सूक्ष्म निरीक्षणाचा अनुभव वाघांच्या हल्ल्याच्या घटनेतून आला. पांढरकवडा विभागात वाघाने शिकार केल्याच्या आठ घटना घडल्या आहेत. त्यातील दोन घटना या के.अभर्णा उपवनसंरक्षक म्हणून रुजू झाल्यानंतर घडल्या आहेत. या दोनही घटनांमध्ये त्यांनी मृताच्या अंगावर वाघाचे पडलेले केस, लाळ याचे नमुने घेऊन बंगलोर व हैदराबादला तपासणीसाठी पाठविले. त्या आधारे नेमक्या कोणत्या वाघाने शिकार केली, हे शोधण्यात आले. अशा पद्धतीने यापूर्वी अनेक हल्ले होऊनही कधीच सूक्ष्म तपासणीचा प्रयत्न झाल्याचे ऐकिवात नाही. एवढे हल्ले होऊनही यापुर्वी वाघाला पकडण्यासाठी कोणतेही खास प्रयत्न केले गेले नव्हते.
घातपाताचा टर्न अन् पोलीस जंगलात
इकडे पाठोपाठ हल्ले होत असल्याने संबंधित एका वन अधिकाऱ्यावर बदली, निलंबन यासारखी कठोर कारवाई होऊ घातली होती. म्हणूनच की काय त्यापासून वन प्रशासनाचे लक्ष विचलित करण्यासाठी एका प्रकरणात वाघाने शिकार केलेली असताना घातपात भासविण्याचा प्रयत्न वनअधिकाऱ्यांकडून झाला. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांची एन्ट्री झाली. पोलिसांनी घटनास्थळाच्या परिसरातील संपूर्ण जंगल छानून काढले. मात्र तो घातपात नव्हे, तर वन्य प्राण्याने केलेल्या हल्ल्यातील मृत्यूच असल्याचा अहवाल पोलिसांनी दिला.