दाभडीला जोडणारा पूल दुर्लक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 09:55 PM2018-09-09T21:55:08+5:302018-09-09T21:56:02+5:30
तालुक्यातील दाभडी येथील ओंकारेश्वर मंदिर ते गावाला जोडणारा पूल गेल्या तीन वर्षांपासून तुटलेला आहे. विशेष म्हणजे याच गावात नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी ‘चाय पे चर्चा’ हा कार्यक्रम घेतला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्णी : तालुक्यातील दाभडी येथील ओंकारेश्वर मंदिर ते गावाला जोडणारा पूल गेल्या तीन वर्षांपासून तुटलेला आहे. विशेष म्हणजे याच गावात नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी ‘चाय पे चर्चा’ हा कार्यक्रम घेतला होता.
दाभडी शिवार आणि ओंकारेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या हा रस्ता आहे. या रस्त्यावरून दररोज मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. याच रस्त्यावर हा पूल आहे. मात्र गेलया तीन वर्षांपासून तो तुटलेल्या अवस्थेत आहे. पुलाचा काही भाग पाण्यात वाहून गेला आहे. त्यामुळे हा पूल जिवघेणा ठरत आहे. याच जिवघेण्या पुलावरून सध्या नागरिकांना जाणे-येणे करावे लागत आहे. यामुळे ग्रामस्थ तथा भाविक घाबरलेले आहे.
या पुलाच्या दुरुस्तीबाबत कुणीच पुढाकार घेत नाही. लोकप्रतिनिधी मूग गिळून बसले आहे. याच गावात चार वर्षांपूर्वी लोकसभा निवडणुकीदरम्यान नरेंद्र मोदी यांनी ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रम घेतला होता. त्यामुळे हे गाव देशाच्या नकाशावर झळकले. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी या गावाला दत्तक घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र निकषात बसत नसल्याने ते शक्य झाले नाही. तथापि गावाच्या विकासासाठी आपण सदैव तत्पर राहू, निदी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली होती. येथील विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन ना.अहीर यांनी मुख्यमंत्र्यांनी दाभडी गाव दत्तक घेतल्याची घोषणा केली होती. मात्र ही घोषणाही फोल ठरली.
आमदार राजू तोडसाम यांनी दाभडीत विकास कामे मंजूर केली. मात्र ‘जखम पायाला अन् मलम डोक्याला’ याच पद्धतीने काम सुरु आहे. गावाला, मंदिराला जोडणारा पूल महत्वाचा असताना अद्याप त्याची दुरुस्ती झाली नाही. उलट गावातील रस्ते मंजूर झाले. यामुळे ग्रामस्थ आणि भाविक वैतागून गेले आहे.
हा पूल महत्वाचा आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या अधिकाºयांना त्वरित पुलाच्या दुरूस्तीचे ईस्टीमेट बनवून प्रस्ताव पाठवायला सांगितले. लवकरच दुरूस्ती केली जाईल.
- आमदार राजू तोडसाम