ऊर्दू साहित्याचा दुर्मिळ व प्राचीन ठेवा दुर्लक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 11:32 PM2018-03-10T23:32:26+5:302018-03-10T23:32:26+5:30

उर्दू साहित्यांचा प्राचीन आणि दुर्मिळ खजाना असलेले उमरखेड येथील वाचनालय सध्या उपेक्षित असून स्थलांतरणानंतर एका कोंडवाड्यात बहुमूल्य ग्रंथसंपदा ठेवण्यात आली आहे. जीर्ण आणि जुन्या या इमारतीत ही ग्रंथसंपदा नष्ट होण्याची भीती व्यक्त होत आहे.

Ignored rare and ancient place of hard material | ऊर्दू साहित्याचा दुर्मिळ व प्राचीन ठेवा दुर्लक्षित

ऊर्दू साहित्याचा दुर्मिळ व प्राचीन ठेवा दुर्लक्षित

Next
ठळक मुद्देउमरखेडचे वाचनालय : कोंडवाड्याच्या इमारतीत ग्रंथसंपदा नष्ट होण्याची भीती

ऑनलाईन लोकमत
उमरखेड : उर्दू साहित्यांचा प्राचीन आणि दुर्मिळ खजाना असलेले उमरखेड येथील वाचनालय सध्या उपेक्षित असून स्थलांतरणानंतर एका कोंडवाड्यात बहुमूल्य ग्रंथसंपदा ठेवण्यात आली आहे. जीर्ण आणि जुन्या या इमारतीत ही ग्रंथसंपदा नष्ट होण्याची भीती व्यक्त होत आहे.
उमरखेड येथे नामवंत असे मौ. मो.अली जोहर उर्दू वाचनालय आहे. या वाचनालयात उर्दू साहित्याचा मोठा ठेवा आहे. अत्यंत प्राचीन व दुर्मिळ ग्रंथ या वाचनालयात आहेत. अनेक वाचक या ठिकाणी नित्यनेमाने जावून या ज्ञानभंडाराचा उपयोग घेत होते. १९९३ पर्यंत सदर वाचनालय उद्यानातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाचनालयात होते. परंतु त्यानंतर उर्दू वाचनालयाचे विभाजन करण्यात आले. सदर वाचनालय आठवडीबाजारातील जनावरांच्या कोंडवाड्यात नेण्यात आले. तेव्हापासून सदर वाचनालय कोणत्याही सुविधेविना सुरू आहे. येथील जुने कर्मचारी सेवानिवृत्त झाल्याने काही दिवस वाचनालय बंद होते.
वाचनालयाची ही इमारत अत्यंत जुनी आणि जीर्ण झाली आहे. ही इमारत पावसाळ्यात गळते. त्यामुळे येथील बहुमूल्य ग्रंथसाठा खराब होण्याची भीती आहे. तसेच इमारत केव्हाही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेक पक्ष, आघाड्या सत्तेत आल्या. नगरसेवक आलेत. विकासासाठी प्रचंड निधीही आला. परंतु वाचनालय उपेक्षितच राहिले.
या उपेक्षित वाचनालयासाठी आता मुव्हमेंट आॅफ पीस अ‍ॅन्ड जस्टीस फॉर वेलफेअर संघटनेने पुढाकार घेतला आहे. नगरपरिषदेने या वाचनालयाच्या इमारतीचे बांधकाम तत्काळ सुरू करावे, इमारतीत वाचन कक्ष अभ्यासिकेचे नियोजन करावे यासाठी निवेदन देण्यात आले आहे. संघटनेचे कार्याध्यक्ष डॉ.फारूक अबरार, अध्यक्ष शेख मोहसीन राज, सचिव अ.जहीर यांनी ही माहिती दिली.
नगरपरिषदेच्या लौकिकाला काळीमा
औदूंबरनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उमरखेड शहराला साहित्यिक आणि सांस्कृतिक वारसा लाभला आहे. अशा या शहरातील अत्यंत प्राचीन व दुर्मिळ ग्रंथसंपदा उपेक्षित आहे. दोन दशकांपासून ही ग्रंथसंपदा जीर्ण इमारतीत असतानाही कुणाचे लक्ष नाही, ही उमरखेड नगरपरिषदेच्या लौकिकाला काळीमा फासणारे आहे.

Web Title: Ignored rare and ancient place of hard material

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.