पशुवैद्यकीय चिकित्सालये दुर्लक्षित

By admin | Published: June 9, 2014 11:52 PM2014-06-09T23:52:40+5:302014-06-09T23:52:40+5:30

तालुक्यातील अनेक पशू वैद्यकीय चिकित्सालये दुर्लक्षित असून याकडे कुणाचेही लक्ष नाही. परिणामी या पशुचिकित्सालयांची अतिशय दुर्दशा झाली आहे.

Ignored veterinary therapies | पशुवैद्यकीय चिकित्सालये दुर्लक्षित

पशुवैद्यकीय चिकित्सालये दुर्लक्षित

Next

पांढरकवडा : तालुक्यातील अनेक पशू वैद्यकीय चिकित्सालये दुर्लक्षित असून याकडे कुणाचेही लक्ष नाही. परिणामी या पशुचिकित्सालयांची अतिशय दुर्दशा झाली आहे.
शासनाने लाखो रूपये खर्चून बांधलेल्या या पशू चिकित्सालयांचा पशू पालकांना पाहिजे तसा लाभही होताना दिसत नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. पशु संगोपन ही आज काळाची  गरज बनली आहे. पशुसंवर्धनाकरिता पशु चिकित्सलयांचे आधुनिकीकरण होणे अतिशय आवश्यक झाले आहे. तालुक्यात पशुवैद्यकीय चिकित्सालयांची   असलेली कमतरता, अत्याधुनिक सुविधेचा अभाव, जनजागृतीची कमतरता, वैद्यकीय तज्ज्ञांची रिक्त पदे, या सर्व दुर्लक्षित बाबींमुळे पशू संख्येतही कमालीची घट झाली आहे.
शेतीला पूरक व्यवसाय म्हणून प्रामुख्याने पशू संवर्धनाकडे पाहिले जाते. पशू संवर्धनामुळेच  पश्‍चिम महाराष्ट्र विकसित झाला आहे. शासनाच्या पशुसंवर्धनासाठी अनेक योजना असल्या, तरी या योजनांची योग्य ती अंमलबजावणीच होत नाही, ही वस्तुस्थिती आहे.
तालुक्यात तीन प्रथम श्रेणी पशू वैद्यकीय दवाखाने व १0 द्वितीय श्रेणी दवाखाने, असे एकूण १३ पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. यामध्ये एका फिरत्या पशुवैद्यकीय दवाखान्याचा समावेश आहे.
याशिवाय पांढरकवडा शहरात शासकीय तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय आहे. परंतु वैद्यकीय अधिकारी व   कर्मचार्‍यांची कमतरता तसेच इतर सोयी-सुविधांचा अभाव, यामुळे या पशु चिकित्सलयांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. पाटणबोरी व धारणा येथील पशू  वैद्यकीय दवाखाना तसेच फिरता पशू वैद्यकीय दवाखाना, अशा तीनही ठिकाणच्या पशुधन विकास अधिकार्‍यांच्या जागा कित्येक दिवसांपासून रिक्तच आहे. विशेष म्हणजे हे तिनही पशु वैद्यकीय दवाखाने श्रेणी-१ मधील आहे. तेथे परिचरांच्या भरवशावर कारभार सुरु आहे.
अनेक ठिकाणी औषधांचा ठणठणाट असून सुविधांचा अभाव आहे. परंतु याकडे लक्ष द्यायला कुणालाही सवड नाही. अडणी, रुंझा, अर्ली, चनाखा, आकोली(बु.), मोहदा, सायखेड, सुन्ना, चालबर्डी व पहापळ या ठिकाणी श्रेणी-२ मधील पशू वैद्यकीय दवाखाने असून, हे दवाखाने अद्याप आहे त्याच अवस्थेत आहे. दवाखान्याच्या केवळ इमारती झाल्या, परंतु अत्याधुनिक सुविधाच नाही. पशुसंवर्धन विभागाने वैद्यकीय अधिकार्‍यांच्या नियुक्तीसोबतच पशुवैद्यकीय दवाखान्यांचे आधुनिकीकरण व बळकटीकरण करणे आवश्यक झाले आहे.
पांढरकवडा येथे शासकीय तालुका लघु पशू वैद्यकीय सर्व चिकित्सालय हे अतिशय जीर्ण झालेल्या इमारतीत सुरु आहे. ही इमारत कधीही कोसळू शकते, अशी परिस्थिती आहे. हे पशुचिकित्सालय पूर्वी नगरपरिषदेकडे होते.
२५ मे २00४ च्या शासन निर्णयानुसार नगरपरिषदेचे पशू दवाखाने तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय दर्जाचे करण्यात आले. या चिकित्सलयाचा कारभार पशू संवर्धन विभागाकडून पाहिला जातो. या दवाखान्यात दर महिन्याला ५५0 ते ६00 पशूंची तपासणी होते. वंध्यत्व शिबिरे तसेच कृती शिबिरे घेतली जातात. चौखुरी, घटसर्प, एकटांग्या, कुपस्या आदी रोगांचे लसीकरण रुग्णालयात व कार्यक्षेत्रातील गावात करण्यात येते. परंतु नगरपरिषदेकडे असलेला हा पशू दवाखाना शासनाकडे हस्तांतरीत झाल्यानंतरही अतिशय जीर्ण इमारतीत आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Ignored veterinary therapies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.