पुसद शहर व परिसरात अवैध धंदे बोकाळले
By admin | Published: March 20, 2017 12:25 AM2017-03-20T00:25:00+5:302017-03-20T00:25:00+5:30
शहर व परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून अवैध धंदे बोकाळले असून त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत.
पोलिसांचे दुर्लक्ष : सर्वसामान्य नागरिकांचे होत आहेत हाल
पुसद : शहर व परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून अवैध धंदे बोकाळले असून त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. हे अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्यात येवून दोषींविरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांची आहे.
गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात अवैध प्रवासी वाहतूक, अवैध दारू, मटका, जुगार, अवैध वृक्षतोड आदी व्यवसाय मोठ्या प्रमाणात बळावले आहे. यातून अनेकांची संसार उद्ध्वस्त होत आहे. मात्र संबंधित शासकीय यंत्रणा डोळे बंद करून आहे. कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने अवैध धंदेवाल्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. यामध्ये आर्थिक हितसंबंध गुंतले असल्यामुळे हा सर्व प्रकार राजरोसपणे सुरू असल्याचे दिसते.
पुसद शहरासह गाव खेड्यांमध्ये अवैध व बनावट दारू काढली जात आहे. यातून अनेकांना विविध आजारांनी घेरले आहे. गावातील तरुण पिढीही व्यसनाधिन होत आहे. तळीराम रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या मुली व मुलांना शिवीगाळ करतात. त्यामुळे वादावादीचे प्रकार होतात. आठवडीबाजारासह शहरात चोऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांची संख्यादेखील मोठ्या प्रमाणात आहे. निंबी, पार्डी, खंडाळा, बेलोरा, माणिकडोह, कारला, शेंबाळपिंपरी, देवठाणा, मारवाडी, रोहडा, जांबबाजार, बान्सी, चोंढी, गहुली, काटखेडा, आरेगाव, वरूड, धुंदी, बोलगव्हाण, हर्षी, गौळ, गिळोणा, काळी, हुडी, हेगडी आदी मार्गांवर अवैध वाहतूक केली जाते.
तसेच गाडीचालक नियमबाह्यरीत्या प्रवासी कोंबून भरधाव वाहने दामटतात. यातून अपघाताचे प्रमाण वाढले असून प्रवाशांचा जीवही धोक्यात आला आहे. तालुक्यातील संवेदनशील भागात मटका व पत्त्याचे डाव रंगत असल्याचे चित्र आहे.
अनेकवेळा तर या अवैध व्यवसायाच्या स्पर्धेतून शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. परंतु अर्थकारणामुळे पोलीससुद्धा याकडे लक्ष देत नाही. पुसद पोलिसांच्या या अकार्यक्षमतेला वरिष्ठांचेही अभय आहे, अशी शंका जनमाणसात व्यक्त होत आहे. (तालुका प्रतिनिधी)
वरिष्ठांकडून दखल घेण्याची होत आहे मागणी
पुसद शहर व तालुक्यात वाढत्या अवैध धंद्यांमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत. याबाबतची संपूर्ण माहिती असतानाही स्थानिक यत्रणा मात्र त्याकडे जाणिवपूर्णक दुर्लक्ष करताना दिसते. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष आहे. आता याकडे वरिष्ठांनीच लक्ष देऊन सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याची मागणी जोर धरत आहे. अवैध दारूबाबत अनेक तक्रारी असताना पोलीसांसह उत्पादन शुल्क अधिकारी कार्यालयाकडून कोणतीही कारवाई केली जात नाही. शासकीय यंत्रणा केवळ बघ्याची भूमिका घेते. लोकप्रतिनिधीसुद्धा याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे नागरिकांमधील रोष वाढतच असल्याचे दिसते.