वणीत विनापरवानगी शेकडो ब्रास मुरुमाचे अवैध उत्खनन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 04:28 PM2024-09-19T16:28:11+5:302024-09-19T16:29:22+5:30
जेसीबी जप्त : नैसर्गिक टेकडीच खोदली, अद्याप दंडाची कारवाई नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी: लगतच्या वागदरा शिवारात शुक्रवारी अवैधरीत्या मुरुमाचे उत्खनन होत असल्याची माहिती महसूल प्रशासनाला मिळताच स्थानिक मंडळ अधिकारी व तलाठ्याने पंचनामा करून जेसीबी जप्त केला आहे.
वागदरा गावालगत पंकज बन्सीलाल भंडारी यांची शेतजमीन आहे. येथेच नैसर्गिक टेकडीवर जेसीबीच्या साहाय्याने खोदकाम सुरू असल्याची माहिती महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. खोदकाम केलेल्या नैसर्गिक टेकडीचा पंचनामा करून लगतच शेतमालकाला विचारपूस केली. यात सहा मीटर रुंद व दोन मीटर खोल असे खोदकाम केले असल्याचे निष्पन्न झाले. शिवाय ७८० चौरस मीटर मुरुमाचे खोदकाम करून सदर मुरुमाची वाहतूक केल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. वागदरा गावात माती, मुरूम चोरीचेही प्रस्थ वाढत सर्वत्र पहावयास मिळत आहे. शेतीचे उत्खनन करण्याच्या नावावर माती-मुरूमची बेकायदेशीररित्या तस्करी बिनधास्त सुरू आहे. राजरोसपणे जेसीबी, पोकलेन मशीनच्या साहाय्याने नियमापेक्षाही जास्त जमीन खोदून मुरूम लंपास केला जातो. हा सगळा प्रकार इतका सराईतपणे होत आहे की, कुणालाच कायद्याची किंवा कारवाईची भीती वाटत नाही. याच्या पाठीमागे काय गौडबंगाल आहे, याचं गणित सामान्य माणसाला उलगडत नाही. कमी ब्रासची रॉयल्टी काढून जास्त ब्रास मुरूम काढणे किंवा शेकडो ब्रास रॉयल्टीच्या नावाखाली हजारो ब्रास मुरूम काढण्याच्या अनुचित प्रकाराने शासनाला लाखो रुपयांचा चुना लावला जात आहे. महसूल प्रशासनाने रॉयल्टीधारकांनी दिलेल्या नियोजित जागेवर जाऊन परवानगी आणि प्रत्यक्ष केलेले उत्खनन याची चौकशी करून कारवाई केल्यास रॉयल्टीच्या नावावर मोठे घबाड उघडे पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
संभाजी ब्रिगेडचा आंदोलनाचा पवित्रा
वणी विभागात होत असलेले अवैध उत्खनन, वाहतूक व तस्करी तत्काळ थांबवली नाहीतर संभाजी ब्रिगेडतर्फे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. वागदरा (नविन), मोहदा, रासा, वांजरी आदी गावात मागील काही वर्षापासून मुरुमाचे सर्रास उत्खनन सुरू आहे. याबाबत संबंधित विभाकडे अनेकदा संभाजी ब्रिगेड व त्या परिसरातील नागरिकांनी तक्रारी केल्या. परंतु संबंधित अधिकारी व कर्मचारी अवैध उत्खनन व वाहतूक करण्यास जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. निवेदन देताना संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अजय धोबे, अॅड. अमोल टोंगे, खलील शेख, दत्ता दोहे, आशिष रिंगोले व इतर नागरिक उपस्थित होते.
"याबाबत मंडळ अधिकारी व तलाठ्यांनी अहवाल सादर केला. त्याप्रमाणे एकाच गटात खोदकाम करून त्याची इतरत्र कुठेही वाहतूक झाली नाही. यात कुठेही गैरप्रकार आढळला नाही."
- निखिल धुळधर, तहसीलदार वणी