अवैध सावकारी, क्रिकेट सट्ट्याने देशोधडीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 11:38 PM2018-10-05T23:38:09+5:302018-10-05T23:38:54+5:30

अवैध सावकारीतील अव्वाच्या सव्वा व्याजाने आणि क्रिकेट सट्ट्यात बरबाद झालेले अनेक जण आत्महत्येच्या वाटेवर आहेत. त्यांच्याकडील थकीत वसुलीसाठी गुंडांच्या येरझारा, तगादा, धमक्या सुरू आहेत. त्यामुळे त्रस्त झालेल्या अनेकांच्या डोक्यात आत्महत्येचा विचार घोळतो आहे.

Illegal moneylenders, unprofessional cricket match | अवैध सावकारी, क्रिकेट सट्ट्याने देशोधडीला

अवैध सावकारी, क्रिकेट सट्ट्याने देशोधडीला

Next
ठळक मुद्देअनेक जण आत्महत्येच्या वाटेवर : एकाच्या आत्महत्या संदेशाने खळबळ, वसुलीसाठी गुंडांच्या धमक्या

राजेश निस्ताने ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : अवैध सावकारीतील अव्वाच्या सव्वा व्याजाने आणि क्रिकेट सट्ट्यात बरबाद झालेले अनेक जण आत्महत्येच्या वाटेवर आहेत. त्यांच्याकडील थकीत वसुलीसाठी गुंडांच्या येरझारा, तगादा, धमक्या सुरू आहेत. त्यामुळे त्रस्त झालेल्या अनेकांच्या डोक्यात आत्महत्येचा विचार घोळतो आहे. त्यातूनच एका त्रस्ताने आपल्या समाजाच्या व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपवर ‘आपल्यापुढे परिवारासह आत्महत्येशिवाय पर्याय नाही’ असा संदेश टाकल्याने क्रिकेट बुकी व अवैध सावकारांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे.
पांढरकवडा येथील आंध्रप्रदेशचा अवैध सावकार राजू अण्णाचे नेटवर्क उद्ध्वस्त करणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेपुढे यवतमाळ शहरातील अवैध सावकार व क्रिकेट बुकींचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. एलसीबीने या अण्णा बनून वावरणाºया अनेक बुकी व सावकारांचाही पांढरकवडा स्टाईलने बंदोबस्त करून आत्महत्येच्या वाटेवरील अनेकांना असे करण्यापासून परावृत्त होण्यास मदत करावी, असा या त्रस्तांचा सूर आहे.
‘लोकमत’ने अलिकडेच कोट्यवधींचा भूखंड घोटाळा उघडकीस आणला. त्यात सात गुन्हे नोंदविले जाऊन १३ आरोपींना अटक केली गेली. मात्र यातील बहुतांश आरोपीसुद्धा क्रिकेट सट्टा व अवैध सावकारीतच बरबाद झाल्याचे सांगितले जाते. हारलेल्या रकमेची तडजोड करण्यासाठीच मग त्यांना भूखंड घोटाळ्याचा आडमार्ग निवडावा लागला. या घोटाळ्यातील दोन आरोपी अद्यापही पसार आहेत. यातील एक प्रगतीशील शेतकºयाचा मुलगा आहे. तोसुद्धा महादेव मंदिर परिसरातील एका बुकीकडे क्रिकेट सट्ट्यात मोठी रक्कम हारला. अवैध सावकारीचाही त्याला फटका बसला. या आरोपीचे प्रतिष्ठीत कुटुंबिय आता बुकी व अवैध सावकारांविरोधात कायदेशीर कारवाईच्या दृष्टीने चाचपणी करीत आहे.
क्रिकेट सट्ट्यात अनेक जण बरबाद झाले आहे. काहींनी त्यामुळे आपली जीवन यात्रा संपविली. तर काही जण त्या वाटेवर असल्याचे बोलले जाते. यवतमाळातील भूखंड घोटाळ्यात अडकलेल्या एका आरोपीच्या पित्याने आपल्या समाजाच्या व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपवर आत्महत्येशिवाय पर्याय उरला नसल्याचा संदेश टाकून खळबळ उडवून दिली आहे. या ग्रुपमधील ४१ सदस्य या संदेशाचे साक्षीदार आहेत. सदर त्रस्त व्यक्तीकडे सावकारीतील पैशाच्या वसुलीसाठी काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक गेले होते, त्यांनी कुटुंबातील बाळाच्या अपहरणाची धमकी दिल्याचीही चर्चा आहे.
अशीच स्थिती यवतमाळ शहरातील क्रिकेट सट्टा व अवैध सावकारीच्या जाचात अडकलेल्या अनेकांची आहे. त्यांनाही व्याजाचे चक्र, धमक्यांचा सामना करावा लागतो आहे. वर्षानुवर्षे व्याज देऊनही त्यांच्यावर मुद्दल कायमच आहे. घेतलेल्या कर्जाच्या किती तरी अधिकपट रक्कम देऊनही त्यांचे कर्ज फिटलेले नाही. क्रिकेट सट्टा चालविणारे शहरात आठ ते दहा जण आहेत. त्यातील अनेकांची साखळी महादेव मंदिर परिसर व इतरत्र जुळलेली आहे. अवैध सावकारांवर कारवाईचे अधिकार सहकार प्रशासनाला आहेत तर क्रिकेट बुकींवर कारवाईचे अधिकार पोलिसांना आहे. सहकार प्रशासन तर ‘तक्रार आल्याशिवाय नाही’ असे म्हणून सरळ हात वर करताना दिसते. स्वत:हून दखल घेऊन कुण्या अवैध सावकारावर सहकार प्रशासनाने धाड घातल्याचे ऐकिवात नाही. यवतमाळात मोठ्या प्रमाणात आणि तेही पोलिसांच्या कार्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर क्रिकेट सट्टा सुरू असताना पोलीस कारवाई करीत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते. यातून पोलीस व क्रिकेट बुकींची ‘साखळी’ उघड होते. दत्त चौकासह शहरात अन्य काही ठिकाणी सुरू असलेले हे क्रिकेट सट्ट्याचे केंद्र पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेला आव्हान देत आहे.

वर्षभरात ५५० क्रिकेट सामन्यांवर लागतो कोट्यवधींचा सट्टा
वर्षाचे जेवढे दिवस आहेत त्या पेक्षा दुपटीने क्रिकेट सामने (प्रिमीअर लिग) जगभर सुरू असतात. आयपीएल, केपीएल, टीएनपीएल या भारतातील तीनच लिगचे वर्षभरात दीडशे क्रिकेट सामने होतात. याशिवाय विदेशातील बिग बॅस, सीपीएल, बांगलादेशसह चार प्रिमीअर लिग होतात. प्रत्येक प्रिमीअर लिगमध्ये ४० ते ५० सामने राहतात. वर्षाला जगभरात प्रिमीअर लिगमध्ये क्रिकेटचे साडेपाचशेवर सामने खेळले जातात. त्यावर हजारो कोटींचा सट्टा चालतो. सट्टा लावणारा चार-दोन वेळा जिंकतो मात्र बहुतांश वेळा हारतोच. जिंकतो तो क्रिकेट बुकीच. मात्र क्रिकेट सट्ट्याच्या या नादात शेकडो लोक देशोधाडीला लागले आहेत. दिवसभरातील उलाढालीचा दुसºया दिवशी ११ वाजता हिशेब केला जातो. हारलेल्या व्यक्तीला पैसे द्यायचे असेल आणि पैसे नसेल तर बुकी त्याच्या थकीत पैशावर व्याजाचे चक्र सुरू करतो. याच पद्धतीने क्रिकेट सट्ट्या पाठोपाठ खेळणारा व्यक्ती अवैध सावकारीत अडकतो. यवतमाळातील भूखंड घोटाळ्यात अडकलेल्या बहुतांश आरोपींचेही असेच झाले. पर्यायाने ते आज कारागृहात आहेत.

Web Title: Illegal moneylenders, unprofessional cricket match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.