पैनगंगेतून अहोरात्र रेतीची अवैध लूट, प्रशासनाचा कानाडोळा की मिलीभगत?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2023 03:59 PM2023-11-07T15:59:48+5:302023-11-07T16:00:52+5:30
लाखोंच्या महसुलावर सोडले पाणी : रेती घाट सर्रास नसून चार तालुक्याला पुरवठा
विवेक पांढरे
फुलसावंगी (यवतमाळ) : साधारण वर्षभरापासून जिल्ह्यात एकही रेती घाट सुरू नसूनही फुलसावंगी येथील पैनगंगा नदीतून रेतीची सर्रास लूट केली जात आहे. यात अधिकाऱ्यांना हाताशी धरून माफिया कारनामा करीत आहेत. या नदीच्या पात्रातील रेती चांगल्या दर्जाची असल्याने येथील रेतीला महागाव, पुसद, उमरखेड, माहूर तालुक्यात प्रचंड प्रमाणात मागणी आहे. म्हणून या परिसरातील पैनगंगा नदीतून अवैध रेती उत्खननाचे प्रमाण वाढले आहे.
सुमारे ४० ट्रॅक्टरद्वारे दररोज पैनगंगा नदीच्या पात्रातून हिंगणी, दिगडी अतिउच्च पातळी कोल्हापुरी बंधाऱ्याजवळून तसेच मोठा नाला, मुस्लीम कब्रस्तान जवळील नाला, राहुर रोडवरील नाला इत्यादी ठिकाणाहून अहोरात्र अवैध रेतीचे उत्खनन केले जात आहे. गावाच्या चारही बाजूच्या निर्जनस्थळी व हिंगणी पांदण रस्त्यावर या अवैध उत्खनन केलेल्या शेकडो ब्रास रेतीची साठवणूक केली जात आहे. नंतर दिवसाढवळ्या महागाव, पुसद, उमरखेड, माहूरच्या रेती माफियाशी संपर्क साधून त्यांना ती विकली जात आहे. प्रशासनाच्या नाकावर टिच्चून ती रेती टिप्पर, ट्रकद्वारे रात्रभर वाहतूक केली जात आहे.
फुलसावंगी ते हिंगणी रस्त्यावर साठेबाजी
येथील पैनगंगा नदीवरील दिगडी उच्च पातळी बंधाऱ्याजवळून, नदीच्या मेळातून, राहुर रोडवरील ओढ्यावरून तसेच मोठा नाला या ठिकाणावरून रात्रंदिवस रोज ४० ट्रॅक्टरने शेकडो ब्रास रेतीचा अवैध उपसा होत आहे. फुलसावंगी ते हिंगणी पांदण रस्त्यावर मोठी साठेबाजी करून ही चोरीची रेती महागाव, पुसद, उमरखेड, माहूरच्या रेती माफियांच्या टिप्परला विकली जाते. त्यामुळे या परिसरात अवैध रेती उत्खननाला महसूल विभागाचे पाठबळ असल्याचे दिसत आहे.
‘झिरो पाेलिसा’च्या माध्यमातून वसुली
रेती माफियाला पाठबळ देण्यात पोलिस विभागही मागे नाही. येथे जर अवैध रेतीची वाहतूक करावयाची असेल तर रेतीच्या प्रत्येक ट्रॅक्टर मालकाकडून ‘झिरो पोलिस’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माणसाच्या मध्यस्थीने प्रति महिना १३ हजार प्रत्येकी वसुली केली जात आहे. तर महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी टाकून आपापली ‘माया’ जमा करण्यात मश्गुल आहे. यामध्ये जो रेती ट्रॅक्टर मालक १३ हजार रुपये देण्यास असमर्थता दर्शवत असेल, तर पोलिस यंत्रणा ट्रॅक्टर मालकाच्या मागावर रात्रंदिवस असते.
महसूल विभागातील काॅल डिटेल्स तपासा
रेती माफिया आणि प्रशासनाचे लागेबांधे शोधण्यासाठी महसुली विभागातील व पोलिस विभागातील अधिकाऱ्यांचे काॅल डिटेल्स काढून तपासण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे. अशी तपासणी झाल्यास अधिकाऱ्यांचे अवैध रेती उत्खनन करणाऱ्या रेती माफियाशी किती मधुर संबंध आहेत, हे उघड होण्याची शक्यता आहे.
गुन्हेगार, पत्रकार, राजकारणीही गुंतले
या व्यवसायात भांडवल व वेळही कमी लागतो, तर पैसा जास्त कमविता येत असल्याने या व्यवसायातही आता पूर्वाश्रमीचे गुन्हेगार, पत्रकार, राष्ट्रीय पक्षाचे तालुक्यावरील पदाधिकारी जास्त संख्येने गुंतले आहेत. हा प्रकार एवढ्यावरच थांबत नाही. तर काही वेळा गावातून विरोध वाढताच महसूल विभागातील ‘झारीतील शुक्राचार्य’ या रेती माफियांना साठेबाजी केलेल्या रेतीची कशी एक नंबरमध्ये विल्हेवाट लावायची याची माहिती पुरवतात. कायद्याच्या चौकटीत राहून रेती माफियांना पुरेपूर सहकार्य करतात. अर्थात याचा ते अधिकारी योग्य ‘मोबदला’ही घेतात.