तिवस्यात रेशनच्या धान्यावर परवानाधारकाचाच डल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2022 03:03 PM2022-01-07T15:03:50+5:302022-01-07T15:20:13+5:30
तिवसा येथे रेशन धान्य दुकानदाराने लाभार्थ्यांना दहा किलो धान्य देऊन ३५ किलो दिल्याची नोंद घेतली, तर एका महिलेला मोफतचे धान्य १० ते १२ रुपये किलो दराने विकत घेण्यास भाग पाडले.
यवतमाळ : रेशन धान्य दुकानदारांकडून(Ration Shops) गरिबांची लूट केली जाते. ही बाब सर्वश्रृत आहे. तिवसा येथे मात्र याहीपेक्षा भयंकर प्रकार घडला आहे. तेथील रेशन धान्य दुकानदाराने गरिबांना दहा किलो धान्य देऊन ३५ किलो धान्य दिल्याची नोंद घेतली आहे. या गंभीर प्रकाराची तक्रार पुराव्यानिशी करण्यात आली. याची दखल घेऊन जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहे.
शासनाच्या विविध योजनांमार्फत गोरगरिबांसाठी मोफत धान्य पुरविले जाते. यात अंत्योदय योजनेतून ३५ किलो, गरीब कल्याण योजनेतून २० किलो धान्य दिले जाते. प्रत्यक्षात मात्र तिवसा येथील परवाना दुकानदार यात मोठी हेराफेरी करीत आहे. हा प्रकार गावातील सजग असलेल्या युवकाने उघड केला. त्याने रेशन धान्य वितरित करत असतानाचे स्टिंग ऑपरेशनच केले.
लाभार्थ्यांना दहा किलो धान्य देऊन उरलेले धान्य १० ते १२ रुपये किलोने इतर कूपन नसलेल्या कुटुंबांना विकले जात होते. वारंवार कूपन देण्याबाबत विनवणी करूनही या परवानाधारकांकडून त्यात अडथळे आणले जात होते. गरिबी व अज्ञानाचा फायदा घेऊन धान्याची लूटच सुरू होती. हा सर्व प्रकार व्हिडिओ चित्रिकरणासह उजेडात आणण्यात आला. मात्र, परवानाधारकाला संघटनेचे पाठबळ असल्याने आजपर्यंत कोणतीच कारवाई झाली नाही.
राजेश राठोड या युवकाने पुढाकार घेऊन हे स्टिंग ऑपरेशन केले व त्याची थेट पुरवठा मंत्र्यांकडे तक्रार केली. आशा परसरात राठोड या महिलेला दहा किलो धान्य देऊन ३५ किलो दिल्याची नोंद घेतली, तर सविता संजय राठोड या महिलेला कूपन न देता १० ते १२ रुपये किलो दराने मोफतचे धान्य विकत घेण्यास भाग पाडले. याच पद्धतीने इतरही लाभार्थ्यांची फसवणूक येथून सुरू असल्याचे उजेडात आणले. याची दखल थेट जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार यांनी घेतली असून सखोल अहवाल मागितला आहे.
चौकशीसाठी तीन दिवसांची मुदत
चौकशी अहवाल सादर करण्यासाठी तीन दिवसांचा अवधी दिला आहे. या तक्रारीचे निराकरण १२ जानेवारीपूर्वी करायचे असल्याने त्याची माहिती तत्काळ देण्याचे निर्देश यवतमाळ तहसीलदार यांना देण्यात आले आहे.
रेशनच्या धान्याची ढाब्यांवर विक्री
तिवसा येथील रेशन दुकानातील धान्य विक्रीसाठी यवतमाळातील ढाब्यांवर आणले जाते. ग्रामस्थ या धान्याचा ट्रक जाताना उघड्या डोळ्याने पाहतात. मात्र, संबंधितांकडून धमक्या व मारहाण होत असल्याने तक्रार करण्यास कुणी पुढे येत नाही, असेही मंत्र्यांकडे केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. रेशन परवानाधारकाची दहशत मोडीत काढण्याची विनंती तक्रारीतून केली आहे.