उमरखेडमध्ये रेतीचे अवैध साठे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2019 10:44 PM2019-08-16T22:44:42+5:302019-08-16T22:45:07+5:30
तालुक्यात ठिकठिकाणी रेतीचे अवैध साठे करण्यात आले. ढाणकी रस्त्यालगतच्या वेअर हाऊसजवळ हजारो ब्रास रेतीचा अवैध साठा निर्माण झाला. या साठ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी येथील तहसीलसमोर शुक्रवारपासून उपोषण सुरू केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : तालुक्यात ठिकठिकाणी रेतीचे अवैध साठे करण्यात आले. ढाणकी रस्त्यालगतच्या वेअर हाऊसजवळ हजारो ब्रास रेतीचा अवैध साठा निर्माण झाला. या साठ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी येथील तहसीलसमोर शुक्रवारपासून उपोषण सुरू केले आहे.
रेती व्यवसायात अल्पावधीत रग्गड पैसा मिळत असल्याने अनेक राजकीय पदाधिकाऱ्यांनी आपला मोर्चा या व्यवसायाकडे वळविला आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. राजकीय पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यास प्रशासन धजावत नाही. परिणामी तालुक्यात पैनगंगा नदीपात्रातून रेतीचा मोठ्या प्रमाणात उपसा करण्यात आला. तालुक्यातील तिवडी, साखरा, देवसरी, खरूस, चालगणी, गुरफळी, बोरी, ब्राह्मणगाव, दिघडी, कारखेड आदी ठिकाणी रेतीसाठे करण्यात आले. शहरातही ढाणकी रस्त्यालगतच्या वेअर हाऊस, रहीमनगर, यूपीपी कॉलनी आदी परिसरात अवैध रेतीसाठे दिसून येत आहे.
पैनगंगा नदीपात्रातून हजारो ब्रास रेतीचे अवैध उत्खनन करून त्याचा साठा करण्यात आला. हे साठे जप्त करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी वारंवार केली जात आहे. मात्र अद्यापही कारवाई होत नसल्याने अखेर शुक्रवारपासून येथील शे. निसार, सतीश कोल्हे, दिगांबर मनवर, संभा भोयर, शेजमीर आदींनी उपोषण सुरू केले आहे.
वरिष्ठ लक्ष देतील का ?
उमरखेड तालुक्यातील अवैध रेती साठ्यांची माहिती वरिष्ठांपर्यंत पोहोचली आहे. तथापि, रेती तस्कर दिवसाढवळ्या याच साठ्यातून रेतीची विक्री करताना दिसून येत आहे. महसूलकडून कठोर कारवाई होत नसल्याने रेती तस्कर निर्ढावले आहे. यामुळे आता वरिष्ठ अधिकारी याकडे लक्ष देऊन रेती तस्करांवर कारवाई करतील का, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.