घाटंजीत अवैध वाहतूक जोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 10:10 PM2019-07-24T22:10:25+5:302019-07-24T22:10:46+5:30

गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात अवैध प्रवासी वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वाहतूक पोलीस नेमके करतात तरी काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अवैध वाहतूक जोमात असताना पोलीस मात्र कोमात गेल्याचे दिसत आहे.

Illegal traffic in Ghatanji | घाटंजीत अवैध वाहतूक जोमात

घाटंजीत अवैध वाहतूक जोमात

googlenewsNext
ठळक मुद्देपोलीस प्रशासन कोमात : वाहतुकीची ऐसीतैसी, तपासणीच्या नावाखाली लूट

लोकमत न्यूज नेटवर्क
घाटंजी : गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात अवैध प्रवासी वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वाहतूक पोलीस नेमके करतात तरी काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अवैध वाहतूक जोमात असताना पोलीस मात्र कोमात गेल्याचे दिसत आहे.
येथील पोलीस ठाण्यात वाहतूक पोलीस म्हणून दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती आहे. मात्र अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर त्यांचा वचक राहिला नाही. त्यामुळे वाहतूकदार दिवसभरात चार ते पाचदा येणे-जाणे करतात. घोटी, कुर्ली, पाटापंगरा, अकोलाबाजार, पारवा, येळाबारा, रूंझा येथे जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात अवैध प्रवासी वाहतूक केली जाते. वाहनधारक जादा पैसा मिळविण्याच्या हेतूने वाहनात क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवितात. यामुळे प्रवाशांची सुरक्षा टांगणीला लागली आहे.
जादा प्रवासी वाहतुकीमुळे वाहनांचा मोठा अपघात होण्याची शक्यता बळावली आहे. हे अवैध प्रवासी वाहतूक करणारे एस.टी.बस येण्याच्या काही मिनिटांपूर्वीच आपली वाहने प्रवाशांनी खचाखच भरुन आपापल्या दिशेने रवाना होतात. यामुळे एस.टी.प्रशासनाला चुना तर लागतोच, शिवाय नागरिकांनाही जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागतो. वाहतूक पोलिसांनी अवैध प्रवासी वाहतुकीस वेळीच आळा घालून वाहनधारकांवर कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
अवैध प्रवासी वाहतुकीची वाहने पोलीस ठाण्यासमोरून धावतात. तरीही कागदपत्रांची तपासणी केली जात नाही. चालक परवाना, नोंदणी प्रमाणपत्र, वाहन फिटींग प्रमाणपत्रांची तपासणीच होत नाही. वाहनाचे छत व बोनटवर प्रवासी वाहून नेत असतानाही पोलीस दुर्लक्ष करतात. त्यांना हात दाखविण्याची हिम्मतही पोलीस करीत नाही. यामुळे अशा वाहनांचा अपघात होऊन नागरिकांचा बळी जाण्याची शक्यता बळावली आहे. अपघातांत नागरिकांचा बळी गेल्यास वाहतूक पोलिसांवर गुन्हे दाखल करायचे का, असा प्रश्न नागरिक विचारत आहे. दुसरीकडे तपासणीच्या नावाखाली दुचाकी चालकांना त्रास दिला जातो.
‘अर्थपूर्ण’ संबंधामुळे पोलिसांचे दुर्लक्ष
अवैध प्रवासी वाहतुकीकडे ‘अर्थपूर्ण’ संबंधामुळे वाहतूक पोलीस दुर्लक्ष करतात. वाहनधारकांकडून दरमहा ठरावीक रक्कम उकळतात. यातूनच एका वाहतूक शिपायाने मोठी माया गोळा केली. विशेष म्हणजे संबंधित कर्मचारी गेल्या आठ वर्षांपासून येथे ठाण मांडून आहे. एवढ्या वर्षात त्यांची बदली का झाली नाही, असा प्रश्न जनतेला पडला आहे. संबंधित कर्मचारी ‘लाभाचे पाट’ वरिष्ठांपर्यंत तर पोहोचवीत नाही ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे. येथे नव्यानेच रुजू झालेल्या ठाणेदार व वरिष्ठांनी याकडे लक्ष देऊन जनतेच्या जीवाशी सुरू असलेला खेळ थांबवावा, अशी अपेक्षा आहे.

Web Title: Illegal traffic in Ghatanji

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.