अवैध प्रवासी वाहतुकीने एसटीचा महसूल बुडतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 09:26 PM2018-09-24T21:26:59+5:302018-09-24T21:27:15+5:30

Illegal travel traffic drops ST's revenue | अवैध प्रवासी वाहतुकीने एसटीचा महसूल बुडतो

अवैध प्रवासी वाहतुकीने एसटीचा महसूल बुडतो

Next
ठळक मुद्देकामगार सेनेचे साकडे : ‘नो पार्किंग झोन’ची अंमलबजावणी करा

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बसस्थानके, प्रवासी निवारे याठिकाणी ‘नो पार्किंग झोन’ची अंमलबजावणी काटेकोरपणे केली जात नाही. या ठिकाणाहून चालणाऱ्या अवैध प्रवासी वाहतुकीमुळे एसटीचा महसूल बुडत आहे. त्यामुळे ‘नो पार्किंग झोन’ची अंमलबजावणी करावी, असे साकडे महाराष्ट्र एसटी कामगार सेनेने जिल्हाधिकाऱ्यांना घातले आहे. एसटीचा पर्यायाने शासनाच्या महसुलाचे नुकसान होत असल्याचे प्रामुख्याने नमूद करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील सर्व प्रमुख बसस्थानक आणि विविध गावात असलेले बस थांबे अवैध प्रवासी वाहतूक आणि अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे. राज्यात केवळ एसटी महामंडळालाच टप्पा वाहतुकीची परवानगी आहे. इतर कुठल्याही वाहतुकीला तसा परवाना दिला जात नाही. मात्र या सर्व नियमांचे उल्लंघन करून खासगी वाहनांद्वारे अवैधरित्या टप्पा वाहतूक केली जात आहे. एसटीच्या उत्पन्नासाठी या बाबी घातक ठरत आहे.
महामंडळाच्या यवतमाळ जिल्ह्यातील सर्व नऊही आगारामार्फत विविध मार्गांवर शटल सेवा (साधारण सेवा) चालविली जात आहे. याकडे प्रवासी आकर्षित व्हावे तसेच एसटीद्वारे प्रवास करून महामंडळाचे उत्पन्न पर्यायाने महाराष्ट्र शासनाचे उत्पन्न वाढावे याकरिता ‘नो पार्किंग झोन’ची काटेकोरपणे अंमलबजावणी आवश्यक आहे. बसस्थानक किंवा बसथांब्यापासून २०० मीटरच्या आत कुठलीही खासगी वाहने लावली जाऊ नये, यासाठी उपाययोजना केल्या जाव्या, असे निवेदनात म्हटले आहे.
बसस्थानकाबाहेर २०० मीटर ‘नो पार्किंग झोन’चे बोर्ड लावण्यात यावे. पोलीस व परिवहन विभागामार्फत तपासणी मोहीम राबवून अवैध वाहतुकीच्या वाहनांवर कारवाई करण्यात यावी, असे एसटी कामगार सेनेचे प्रादेशिक सचिव अरुण गाडगे यांनी म्हटले आहे.
कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनवाढ
परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकरराव रावते यांनी एसटी कामगारांना सुधारित वेतनवाढ लागू केली आहे. त्यामुळे महामंडळाच्या खर्चात वाढ झाली आहे. उत्पन्न वाढीसाठी शटल सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे बसस्थानकापासून खासगी वाहतूक थांबविणे अतिशय महत्त्वाचे असल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

Web Title: Illegal travel traffic drops ST's revenue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.