वणीतील जनता कर्फ्यूला तूर्त स्थगिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 05:00 AM2020-06-30T05:00:00+5:302020-06-30T05:00:58+5:30
सोमवारी पहिल्या दिवशी वणीकर जनतेकडून या कर्फ्यूला प्रचंड प्रतिसाद मिळाला. दिवसभर शहरातील व्यापारी प्रतिष्ठाणांनी कडकडीत बंद ठेवला. मात्र प्रशासनाच्या विनंतीवरून पाच दिवसांचा हा जनता कर्फ्यू तूर्तास स्थगित करण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : शहरात कोरोनाचे रूग्ण आढळल्यानंतर खबरदारी म्हणून शनिवारी सर्वपक्षिय नेत्यांनी एकत्र येऊन पाच दिवसांच्या जनता कर्फ्यूची घोषणा केली होती. त्यानुसार सोमवारी पहिल्या दिवशी वणीकर जनतेकडून या कर्फ्यूला प्रचंड प्रतिसाद मिळाला. दिवसभर शहरातील व्यापारी प्रतिष्ठाणांनी कडकडीत बंद ठेवला. मात्र प्रशासनाच्या विनंतीवरून पाच दिवसांचा हा जनता कर्फ्यू तूर्तास स्थगित करण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी दिली.
यासंदर्भात सायंकाळी सर्वपक्षिय नेत्यांची बैठक स्थानिक विश्रामगृहात पार पडून त्यात हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, राष्ट्रवादीचे डॉ.महेंद्र लोढा, काँग्रेसचे प्रमोद निकुरे, व्यापारी असोसिएशनचे राकेश खुराणा, समाजवादी पार्टीचे रज्जाक पठाण, वंचित बहूजन आघाडीचे मंगल तेलंग, बहुजन समाज पार्टीचे प्रवीण खानझोडे, शिवसेनेचे महेश चौधरी, मिलिंद पाटील आदी उपस्थित होते.
शनिवारी पाच दिवसांचा जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आल्यानंतर काहींनी त्याला विरोधही केला होता. परंतु घोषित केलेला कर्फ्यू नागरिकांनी उत्स्फुर्तपणे पाळल्याचे चित्र सोमवारी दिसून आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सकाळी ८ ते ५ वाजेपर्यंत प्रतिष्ठाणे उघडी ठेवण्यास सूट देण्यात आली आहे. त्यानुसार येथील बाजारपेठ सकाळी ८ वाजता सुरू होते. मात्र जनता कर्फ्यूमुळे सकाळपासूनच शहरातील बोटावर मोजण्याइतकी दुकाने वगळता संपूर्ण बाजारपेठ बंद होती. शहरात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू नये, विषाणुंची साखळी तुटावी, या हेतूने सर्वपक्षियांनी एकत्र येऊन पाच दिवसांचा जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेऊन जनतेला तसे आवाहनही केले होते.