शासनाच्या नाकावर टिच्चून कलानृत्याने विसर्जन मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:47 AM2021-09-21T04:47:42+5:302021-09-21T04:47:42+5:30
फोटो दिग्रस : जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव वाढत आहे. त्यामुळे सण, उत्सव साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन प्रशासनाने केले होते. गणपती ...
फोटो
दिग्रस : जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव वाढत आहे. त्यामुळे सण, उत्सव साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन प्रशासनाने केले होते. गणपती विसर्जनावर ही निर्बंध होते. मात्र, शासनाच्या नाकावर टिच्चून येथील देवनगर गणेश मंडळाने परंपरेनुसार कलानृत्य मिरवणूक काढून बाप्पांना वाजतगाजत निरोप दिला.
शासनाकडून परवानगी नसताना कलानृत्याने गणपतीची मिरवणूक काढण्यात आली. जवळपास १०० वर्षांपासून येथील गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत परभणी, हिंगोली, वारंगा फाटा, भोकर फाटा आदी ठिकाणावरून कलाकारांचे १० ते १२ संच येतात. विदर्भात येथील गणपती विसर्जन विशेष असते.
मिरवणुकीत समोर कलाकारांचा ट्रॅक्टर आणि मागील ट्रॅक्टरवर गणपती मूर्ती, अशा प्रकारे शहरातून मिरवणूक काढण्यात येते. मिरवणूक पाहण्यासाठी जिल्ह्यातून नागरिक येत होते. त्यामुळे पाय ठेवायला जागा राहत नव्हती. मात्र, कोरोनामुळे शासनाने विसर्जन मिरवणुकीवर बंदी घातली. तरीही देवनगरातील दोन गणेश मंडळांनी भोकर फाट्यावरून कलानृत्यांचा संच बोलावून शासनाच्या नाकावर टिचून मिरवणूक काढून विसर्जन केले. कलाकारांचे नृत्य बघण्यासाठी चौकाचौकात गर्दी झाली होती.