३० लाख कापूस गाठींची आयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 05:38 PM2019-08-14T17:38:40+5:302019-08-14T17:40:38+5:30

यावर्षी राज्यात कपाशीचे लागवड क्षेत्र वाढल्याने उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र व्यापाऱ्यांनी ३० लाख कापूस गाठींची आयात केल्याने कापसाचे दर घसरण्याचा धोका निर्माण झाला आहे.

Import of 30 lakh cotton bales | ३० लाख कापूस गाठींची आयात

३० लाख कापूस गाठींची आयात

googlenewsNext
ठळक मुद्देदर घसरण्याचा धोका शेतकरी अभ्यासकांचे पंतप्रधानांना पत्र

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : यावर्षी राज्यात कपाशीचे लागवड क्षेत्र वाढल्याने उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र व्यापाऱ्यांनी ३० लाख कापूस गाठींची आयात केल्याने कापसाचे दर घसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. यात पंतप्रधानांनी हस्तक्षेप करावा, अशा आशयाचे पत्र शेतकरी अभ्यासक विजय जावंधीया यांनी पंतप्रधानांना पाठविले आहे.
यावर्षी राज्यात ४१ लाख हेक्टरवर कापसाची लागवड झाली. गतवर्षीच्या तुलनेत ही लागवड पाच लाख हेक्टरने अधिक आहे. यामुळे कापसाचे उत्पादन वाढण्याचा अंदाज आहे. याच सुमारास दाक्षिणात्य व्यापाऱ्यांच्या लॉबीने ३० लाख कापूस गाठींची आयात केली. यामुळे हंगामात कापसाचे दर कोसळण्याचा धोका आहे. यावर वेळेपूर्वीच उपाययोजना करणे गरजेचे आहे.
यामध्ये कापसाला देशात आयात करण्यासाठी शून्य दर आयात कर आहे. हा दर वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे. याशिवाय कापूस निर्यात करताना अनुदान देण्यात यावे, कापसाचा बफर स्टॉक करण्यासाठी शून्य टक्के व्याजदरावर कर्ज उपलब्ध करुन द्यावे, कापसाला एक हजार रुपयांचा बोनस द्यावा, मोठ्या प्रमाणात हमी केंद्र उघडण्यात यावे असे केले तरच शेतकऱ्यांना हमी दराच्या बरोबरीने खुल्या बाजारात कापसाचे दर मिळतील. यासाठी हंगामापूर्वीच उपाययोजना कराव्या, असे पत्र विजय जावंधीया यांनी पंतप्रधानांना लिहिले आहे. गतवर्षी राज्यभरात ६० शासकीय संकलन केंद्र उघडण्यात आले होते. हमीदरापेक्षा जादा दर बाजारात असल्याने या केंद्रावर कापूस आला नाही. मात्र यावर्षी त्याच्या विपरित चित्र निर्माण होण्याचा धोका आहे. यासाठी आधीच उपाययोजना करण्याची मागणी जावंधीया यांनी केली आहे.

हमी दर मिळण्याची शाश्वती नाही
यावर्षीच्या हंगामात केंद्र शासनाने कापसाला क्ंिवटलमागे १०० रुपयांची वाढ सूचविली. हा दर पाच हजार ५५० रुपये क्ंिवटल असणार आहे. कापसाची आयात, रुईचे घसरलेले दर, सरकीच्या घसरलेल्या किंमती, यामुळे कापसाला हमी दरही मिळणे अवघड आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी हमी केंद्र मोठ्या प्रमाणात उघडावे लागणार आहे. इतकेच नव्हेतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खरेदीची व्यवस्थाही ठेवावी लागणार आहे.

कापसाला चांगला दर मिळावा आणि कापसू उत्पादक शेतकऱ्यांचे संरक्षण व्हावे, याच मुख्य उद्देशाने पंतप्रधानांना पत्र पाठविले. या पत्राची पंतप्रधान दखल घेतील, अशी अपेक्षा आहे.
- विजय जावंधिया
शेतकरी नेते

Web Title: Import of 30 lakh cotton bales

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती