इस्लाममध्येही अहिंसेलाच महत्त्व
By admin | Published: December 28, 2015 03:00 AM2015-12-28T03:00:40+5:302015-12-28T03:00:40+5:30
इस्लाम धर्मामध्ये अहिंसेलाच अनन्यसाधारण महत्व आहे. कोठेही हिंसेचे समर्थन केले जात नाही.
पत्रपरिषद : स्टुडंट इस्लामिक आॅर्गनायझेशन आॅफ इंडियाचा उपक्रम
यवतमाळ : इस्लाम धर्मामध्ये अहिंसेलाच अनन्यसाधारण महत्व आहे. कोठेही हिंसेचे समर्थन केले जात नाही. जिहादच्या नावाखाली होत असलेला रक्तपात हा इस्लाममध्ये निषिद्ध आहे, असे स्वामी लक्ष्मी शंकराचार्य यांनी पत्रपरिषदेत सांगितले.
स्टुडंट इस्लामिक आॅर्गनायझेशन आॅफ इंडिया (एसआयओ) या संघटनेकडून मोहंमद पैगंबर यांचा जन्मदिवस साजरा केला जातो. हेच औचित्य साधून एसआयओने २१ ते ३० डिसेंबरदरम्यान ‘मोहंमद पैगंबर (स.) शांतीदूत’ या शीर्षकाखाली दहा दिवसीय अभियान राबविले. इसीसच्या माध्यमातून चुकीचा इस्लाम सांगितल्या जात आहे. त्यामुळेच काही मुस्लीम तरुण खऱ्या इस्लामपासून भरकटले आहे. गैरमुस्लीमांमध्येही इस्लामबाबत गैरसमज आहेत. हे दूर करण्यासाठी हे जाणीव जागृती अभियान हाती घेतले आहे. मशिदीमध्ये इमामांच्या माध्यमातून शांती कायम करण्याचा संदेश दिला जातो, असे एसआयओचे विभागीय अध्यक्ष रेहान फजल यांनी पत्रपरिषदेत सांगितले.
काही संधिसाधूंनी इस्लामची चुकीची प्रतिमा जगासमोर आणली आहे. भारतातील २३ कोटी मुसलमानांमपैकी केवळ बोटावर मोजण्याइतकेच इसीसच्या प्रभावात आले आहेत. यावरून शांतताप्रिय मुसलमानांची संख्या देशात अधिक असल्याचे दिसून येते. हिंदू-मुस्लीम जनएकता मंचच्या माध्यमातून हाच जागृतीचा उपक्रम राबविल्या जात आहे, असे स्वामी लक्ष्मी शंकराचार्य यांनी सांगितले.
पत्रपरिषदेला एसआयओचे जिल्हा शाखाध्यक्ष जियाऊररहेमान, जमाते इस्लामी हिंदचे अजमत उल्ला खान, निझान काझी उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)