उमरखेडमध्ये पारंपरिक वस्तूंचे महत्त्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 09:38 PM2018-11-15T21:38:08+5:302018-11-15T21:39:03+5:30
आधुनिक काळातही ग्रामीण भागात पारंपरिक वस्तूंचे महत्त्व कायम आहे. विशेषत: ग्रामीण भागात आजही पाटा, वरवंट्यांची क्रेज कायम असल्याचे दिसते.
एकनाथ पवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : आधुनिक काळातही ग्रामीण भागात पारंपरिक वस्तूंचे महत्त्व कायम आहे. विशेषत: ग्रामीण भागात आजही पाटा, वरवंट्यांची क्रेज कायम असल्याचे दिसते.
ग्रामीण भागात दगडी पाटे, वरवंट्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. आधुनिक काळात तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे सर्वत्र यांत्रिकीकरणाचा वापर वाढला. त्याचे लोण स्वयंपाक गृहापर्यंत पोहोचले. यांत्रिकीकरणामुळे स्वयंपाक घरातील काही कामे कमी वेळेत होऊ लागली. मिक्सरच्या वापरामुळे दगडी पाटा, वरवंटा आणि खलबत्ताच्या सहाय्याने मसाल्याचे पदार्थ एकत्रित करण्याचे काम मागे पडले. ग्रार्इंडरमुळे ही कामे काही सेकंदातच होऊ लागली.
बाजारात उपलब्ध असणाऱ्या फूड प्रोसेसर व मिक्सरमुळे मसाले बनविण्याचे काम अगदी कमी वेळेत आणि आरामात होते. यामुळे गृहिणींचा कल तिकडे वाढला. तथापि मिक्सरमध्ये बारीक केलेल्या मसाल्यांची चांगली चव येत नसल्याने आजही ग्रामीण व शहरी भागातील काही महिला पुरण पोळीचे पुरण असो, वा आमटीचा मसाला असो, यासाठी पाटे, वरवंट्याचा वापर करतात. त्यावर वाटलेल्या हाताच्या चवीला प्राधान्य देतात. त्यामुळे ग्रामीण भागासह शहरी भागातदेखील बहुतांश ठिकाणी आजही पाटा व वरवंट्यालाच महत्व आहे.विशिष्ट प्रकारचे घडीव व कोरीव काम केल्यानंतर पाटे, वरवंटे तयार होतात. दगड फुटला, तर सगळी मेहनत फुकट जाण्याची भिती असते.