२७९ गावांत उघड्यावर करावे लागते अंत्यसंस्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2024 18:03 IST2024-07-08T18:01:00+5:302024-07-08T18:03:22+5:30
Yavatmal : स्मशानशेडच्या बांधकामासाठी जागाही मिळेना

In 279 villages there is no cremation ground
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : विकासकामांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात असताना जिल्ह्यातील २७९ गावांत स्मशानभूमी शेड नाही. अंत्यसंस्कारासाठी जागाही मिळत नाही. पावसाळ्यात तर अंत्यसंस्कार कुठे करावा, असा प्रश्न नातेवाइकांसमोर उभा राहतो. स्मशानभूमीअभावी २७९ गावातील लोकांना मरणाची भीती वाटते. धार्मिक रितिरीवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार नसेल होत तर मोक्ष कसा मिळणार, हादेखील एक प्रश्नच आहे.
जिल्ह्यात १ हजार ८३१ महसुली गावे आहेत. एकूण ग्रामपंचायतींची संख्या १ हजार २०० आहे. ७०७ स्वतंत्र ग्रामपंचायती असून, ४९३ गट ग्रामपंचायती आहेत. यात २७९ गावांत स्मशानभूमी शेड नाही. घाटंजी, महागाव, मारेगाव, उमरखेड, वणी आणि झरीजामणी या तालुक्यांतील गावात स्मशानभूमी शेडचा प्रश्न गंभीर आहे. पावसाळ्यात हातात छत्री पकडून अंतिम संस्कार करण्याची वेळ नातेवाइकांवर येते. जनसुविधा योजनेच्या निधीतून स्मशानभूमी शेडचे बांधकाम करण्यात येते. काही गावांत जागेची अडचण आहे. तर, वनविभागाच्या हद्दीत असलेली जागा मिळत नाही. यामुळे स्मशानभूमी शेड बांधकामाला अडथळा येत असल्याचे सांगितले जाते. अडचण सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची मागणी करण्यात येत आहे.
कोणत्या तालुक्यात किती गावांत नाही स्मशानभूमी?
तालुका स्मशानभूमी नसलेली गावे
आर्णी १६
बाभूळगाव ०९
दारव्हा १४
दिग्रस १०
घाटंजी २९
कळंब ०७
केळापूर १२
महागाव २६
मारेगाव १९
नेर १२
पुसद १४
राळेगाव १३
उमरखेड १९
वणी ३२
यवतमाळ ०९
झरी ३८
२७९ उपलब्ध नाही गावांत स्मशानभूमीच
■ जिल्ह्यातील २७९ गावात स्मशानभूमीच उपलब्ध नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे नातेवाइकांना उन्हाळा व पावसाळ्ळ्यात त्रासाचा सामना करावा लागतो. झरी तालुक्यातील तब्बल ३८ गावांत स्मशानभूमीचा अभाव आहे.
■ सोबतच घाटंजी, महागाव, मारेगाव, उमरखेड, वणी आदी तालुक्यातही स्मशानभूमी शेडचा प्रश्न गंभीर बनला आहे. ही समस्या निकाली काढण्याची मागणी जोर धरत आहे.
मरणानंतरही भोग संपेना
मृत्यू हे अंतिम सत्य आहे. जन्माला आलेल्या माणसाला मृत्यू हे ठरलेलाच आहे. जीवन जगताना माणसाला संघर्ष करावा लागतो, मात्र, स्मशानभूमी नसलेल्या गावात मरणानंतरही भोग संपत नाही.
पावसाळ्यात आणखी हाल
स्मशानभूमी नसलेल्या गावात अंत्यसंस्कारासाठी नातेवाइकांना मोठी कसरत करावी लागते. पावसाळ्यात तर सुरू चिखलातून अंतिमयात्रा काढावी लागते. पाऊस असल्यास हातात छत्री पकडून अंत्यसंस्कार करावे लागते. पावसामुळे अनेकदा मृतदेह जळून खाक होत नाही. अशाप्रकारचे हाल पावसाळ्यात सहन करावे लागतात.
जनसुविधेतून होणार ८६ कामे
जिल्हा परिषदेला २०२३-२४ या वर्षासाठी जनसुविधा योजनेचा निधी मिळाला आहे. या निधीतून ८६ स्मशानभूमी शेडचे बांधकाम करण्यात येणार आहे. यातील बहुतांश कामांना वर्क ऑर्डर देण्यात आल्याची माहिती आहे. त्यानंतरही अनेक गावांत स्मशानभूमी शेडचा प्रश्न कायमच राहणार आहे.