३१ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीच्या प्रचारतोफा थंडावल्या; रविवारी मतदान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2023 12:28 PM2023-11-04T12:28:20+5:302023-11-04T12:28:45+5:30
८८ जागांसाठी उमेदवारच नाहीत : दोन ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदासाठी नकार
यवतमाळ : येत्या ५ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील ३१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक तर २२ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका पार पडत आहेत. या निवडणुकीच्या प्रचाराला सूर्यास्तानंतर पूर्णविराम मिळाला. या भागामध्ये शुक्रवारची रात्र गुप्त प्रचारासाठी महत्त्वाची ठरणार आहे. या रात्रीतून मतदारांचा कौल बदलण्याच्या दृष्टीने पक्षाकडून प्रयत्न होणार आहे. यामुळे सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही गटांकडून उमेदवारांच्या कार्यकर्त्यांवर पाळत ठेवली जाणार आहे.
जिल्ह्यातील ३७ ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. यामध्ये यवतमाळ तालुक्यातील दोन, दारव्हा दोन, पुसद एक, महागाव एक, घाटंजी आठ, राळेगाव सहा, झरी एक, उमरखेड तीन, बाभूळगाव चार, मारेगाव पाच आणि केळापूरमध्ये चार ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडणार होत्या. या ठिकाणी २८१ जागांसाठी ३६५ उमेदवार रिंगणात आहेत. ३७ पैकी सहा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. यामध्ये बाभूळगाव तालुक्यातील एक, उमरखेड एक, महागाव एक, घाटंजी दोन आणि झरीमधील एका ग्रामपंचायतीचा समावेश आहे. ३७ ग्रामपंचायतींमध्ये ३७ सरपंच पदासाठी ७६ उमेदवार रिंगणात उभे आहेत. या ठिकाणी स्थानिक प्रश्नांवर प्रचारादरम्यान मोठ्या प्रमाणात चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे.
यासाेबत ९४ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका पार पडत आहेत. १३८ जागांसाठी या पोटनिवडणुका होणार होत्या. प्रत्यक्षात ८८ जागांसाठी उमेदवारी अर्जच आले नाहीत. त्यामध्ये दोन गावांमध्ये सरपंचपदासाठी कुणीच अर्ज भरला नाही. पोटनिवडणुकीमध्ये २६ ग्रामपंचायतींमध्ये २६ जागा बिनविरोध झाल्या आहेत. तर २२ ग्रामपंचायतींमध्ये २४ जागांसाठी ५ नोव्हेंबर रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.
या २४ जागांसाठी ५१ उमेदवार रिंगणात उभे आहेत. विशेष म्हणजे एका सरपंचपदासाठी केवळ दोन उमेदवार रिंगणात उतरलेले आहेत. प्रत्येक उमेदवाराला निवडून आणण्यासाठी पक्षाकडून प्रयत्न केले जात आहेत. काही जागांवर गावपातळीवर निवडणुकीमध्ये रस नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
आज पोलिंग पार्ट्या होणार रवाना
५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीकरिता प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणावरून पोलिंग पार्टी रवाना होणार आहे. यासाठी कर्मचाऱ्यांना नियुक्ती देण्यात आलेली आहे. पोलिस विभागासह वाहनांची व्यवस्था देखील निवडणूक विभागाकडून करण्यात आलेली आहे.
सार्वत्रिक निवडणुकीसाठी केवळ दहा हजार रुपये
ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रशासकीय खर्चासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला किमान ५० हजार रुपयांप्रमाणे तरतूद करण्याच्या सूचना आहेत. प्रत्यक्षात या ग्रामपंचायतींना केवळ प्रत्येकी दहा हजार रुपये मिळाले आहेत. तर पोटनिवडणुका पार पडणाऱ्या ग्रामपंचायतीला केवळ पाच हजार रुपये निधी देण्यात आला आहे. या अपुऱ्या निधीमुळे निवडणुका पार पडताना तहसील प्रशासनाची चांगलीच कसरत होणार आहे.
सकाळी ७:३० पासून सुरू होणार मतदान
ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आणि पोटनिवडणुकीसाठी वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये निर्धारित मतदान केंद्रावर सकाळी ७:३० वाजतापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. सायंकाळी ५:३० पर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी ६ नोव्हेंबर रोजी मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे. नक्षलप्रभावित दुर्गम भागामध्ये ७ नोव्हेंबरला मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे. एकूणच मतदान केंद्रांवर व्हिडीओ कॅमेऱ्यांसह पोलिस बंदोबस्तही तैनात ठेवण्यात आलेला आहे. गावातील शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस बंदोबस्त राहणार आहे.