धुळवडीला जुन्या वादातून दगडाने ठेचून युवकाचा खून; आरोपी जेरबंद
By विलास गावंडे | Updated: March 26, 2024 21:33 IST2024-03-26T21:33:15+5:302024-03-26T21:33:58+5:30
अर्जुनसिंग (२५) असे मृत युवकाचे नाव आहे. तो काही वर्षांपासून राळेगाव शहरातील चायनीजच्या गाडीवर मास्टर म्हणून काम करीत होता.

धुळवडीला जुन्या वादातून दगडाने ठेचून युवकाचा खून; आरोपी जेरबंद
राळेगाव (यवतमाळ) : शहरातील तहसील कार्यालय शासकीय वसाहतीमागे असलेल्या परिसरात दगडाने ठेचलेल्या अवस्थेत युवकाचा मृतदेह आढळला. ही घटना धुळवडीच्या दिवशी २५ मार्च रोजी दुपारी निदर्शनास आली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरू केले. सदर युवक हा चायनीज गाडीवर कामाला असल्याचे पुढे आले. त्या युवकाचा जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी आरोपीने खून केल्याचेही उघड झाले. मंगळवारी २६ मार्च रोजी यातील आरोपीला अटक केली.
अर्जुनसिंग (२५) असे मृत युवकाचे नाव आहे. तो काही वर्षांपासून राळेगाव शहरातील चायनीजच्या गाडीवर मास्टर म्हणून काम करीत होता. त्याच्याबाबत इतर कुठलीही माहिती नव्हती. याच परिसरात अर्जुनसिंग राहत असे. त्याचे १५ दिवसापूर्वी साहेबराव मारोती चव्हाण (४०) रा. शांतीनगर याच्यासोबत वाद झाला होता. त्याचा राग साहेबरावने धरुन ठेवला. धुळवडीच्या दिवशी संधी साधत साहेबरावने अर्जुनच्या डोक्यात दगड घालून त्याला ठार केले.
या प्रकरणी जमादार गोपाल वास्टर याच्या तक्रारीवरून राळेगाव पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला होता. आरोपीच्या अटकेची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक अमोल मुडे, जमादार योगेश डगवार, सुनील खंडागळे, सुधीर पांडे, निलेश निमकर, सुधीर पिदुरकर, रजनीकांत मडावी, सतीश फुके तसेच राळेगाव पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक विशाल बोरकर, गोपाल वास्टर, रत्नपाल मोहाडे, विशाल कोवे, सूरज चिव्हाणे, संदीप मारबते यांनी केली.