पोलीस ॲक्शन मोडमध्ये; जातीय दंगली घडविणाऱ्यांच्या कुंडलीचा शोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2022 05:00 AM2022-05-04T05:00:00+5:302022-05-04T05:00:20+5:30
कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी काय केले पाहिजे याचा कार्यक्रमच आखून दिला आहे. जातीय दंगली मध्ये सातत्याने सहभागी असणाऱ्यांवर कठोर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे. यासाठी कलम १५१ (३), १४४ (२) याचाही आधार घेण्यात आला आहे. काहींना १४९ नुसार नाेटीस बजावण्यात आल्या असून कायदा व सुव्यवस्था बाधित होईल, असे कृत्य करू नये याबाबत सूचित करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : राज्यात भोंग्यावरुन जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये जाहीर इशारा दिला. या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्हा पोलीस दल कामाला लागले आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जातीय दंगली घडविणाऱ्यांची कुंडली गोळा केली जात आहे. यासाठी पाच वर्षातील गुन्ह्यांचा निकष ठेवण्यात आला आहे. वारंवार जातीय गुन्ह्यात सहभागी असणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. दिलीप पाटील भुजबळ यांनी सलग दोन दिवस ध्वनीप्रदूषण, पर्यावरण अधिनियम याशिवाय त्या अनुषंगाने निघालेली शासनाची विविध परिपत्रके याचा अभ्यास केला. त्यावरून एक एसओपी तयार करण्यात आली आहे. पोलीस उपमहानिरीक्षक चंद्रकिशोर मीना यांनीसुद्धा पुसद येथील बैठकीत याबाबत निर्देश दिले. त्यावरून सोमवारी सर्व ठाणेदार, उपविभागीय पोलीस अधिकारी यांची बैठक घेण्यात आली. यामध्ये दीर्घ चर्चा झाली. तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी काय केले पाहिजे याचा कार्यक्रमच आखून दिला आहे.
जातीय दंगली मध्ये सातत्याने सहभागी असणाऱ्यांवर कठोर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे. यासाठी कलम १५१ (३), १४४ (२) याचाही आधार घेण्यात आला आहे. काहींना १४९ नुसार नाेटीस बजावण्यात आल्या असून कायदा व सुव्यवस्था बाधित होईल, असे कृत्य करू नये याबाबत सूचित करण्यात आले आहे.
मनसे पदाधिकारी पोलिसांच्या नजरकैदेत?
- वणी येथील मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांना मंगळवारी रात्री नोटीस बजावण्याची प्रक्रिया करण्यात येत होती. त्याच वेळी त्यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्तही लावण्यात आला होता.
वणी पोलिसांची राजू उंबरकर यांना नोटीस
n मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ४ मेपासून आंदोलनाची भूमिका घेतली आहे. यवतमाळ जिल्ह्यात वणी परिसरात काही प्रमाणात मनसेची ताकद आहे. त्यामुळे वणी पोलीस सतर्क झाले आहेत. पक्षाचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांच्यासह दहा पदाधिकारी-कार्यकर्त्यांना सीआरपीसी १९७३ चे कलम १४९ प्रमाणे नोटीस बजावण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे. सध्या भोंगा (स्पीकर) यावरून राजकीय वातावरण तापलेले आहेत. आपणाकडून या संबंधाने विरोध म्हणून विनापरवाना भोंगा लावून नियमांचे उल्लंघन केल्यास आपणाविरुद्ध प्रचलित कायद्यानुसार कार्यवाही करण्यात येईल व सदरील नोटीस ही न्यायालयात आपल्याविरुद्ध पुरावा म्हणून वापरण्यात येईल, असे या नोटिसीत स्पष्ट केले आहे.
अपर अधीक्षकांच्या नियंत्रणात सनियंत्रण समिती
- भोंग्याबाबत जिल्ह्यात सनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. अपर पोलीस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे हे या समितीचे प्रमुख आहे. याशिवाय गृहउपअधीक्षक, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी यांचाही समावेश या समितीमध्ये आहे. उपविभागीय अधिकारी या समितीचे नोडल अधिकारी म्हणून काम करणार आहे. त्यांच्या मार्फतच पोलीस ठाणे स्तरावरून कारवाई केली जाणार आहे. शिवाय नागरिकांनाही तक्रारी करण्यासंदर्भात या समितीची माहिती दिली जाणार आहे.