यवतमाळमध्ये ७९ धोकादायक इमारतीत विद्यार्थी गिरवताहेत शिक्षणाचे धडे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2024 06:50 PM2024-07-09T18:50:47+5:302024-07-09T18:51:33+5:30

प्रशासन बेफिकीर : ४३५ शाळांना हवाय दुरुस्तीचा उपचार

In Yavatmal, 79 dangerous school buildings; students' lives are at risk in school | यवतमाळमध्ये ७९ धोकादायक इमारतीत विद्यार्थी गिरवताहेत शिक्षणाचे धडे

In Yavatmal, 79 dangerous school buildings; students' lives are at risk in school

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ :
जिल्हा परिषदेच्या शाळांचे जुने बांधकाम कालबाह्य झाल्याने इमारती जीर्ण झाल्या आहेत. त्या इमारती पाडून बांधकाम करणे आवश्यक झाले आहे; मात्र कोणत्या ना कोणत्या कारणाने बांधकामास अडथळा येत आहे. परिणामी ७९ जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना धोकादायक इमारतीत अक्षरधडे गिरवावे लागत आहेत. पावसाळ्यात वादळवाऱ्यामुळे दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.


जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या दोन हजार १०३ शाळा आहेत. काही शाळांच्या इमारती तर ब्रिटिशकालीन आहेत. अनेक शाळांचे बांधकाम होऊन ३० ते ४० वर्षांचा कालावधी लोटला आहे. प्रशासनाने केलेल्या पाहणीत ७९ शाळांच्या इमारती पाडून त्याच ठिकाणी नव्याने बांधकाम करावे लागणार आहे. त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी लागणार आहे. काही ठिकाणी तर पालक विद्यार्थ्यांना धोकादायक अशा शाळेत पाठविण्यासाठी तयार नाहीत. त्यामुळे अंगणवाडी, समाजमंदिरात शाळांचे वर्ग भरविले जात आहेत. तर, शाळेच्या वन्हांड्यात बसून शिक्षण घ्यावे लागत असल्याचे वास्तव आहे. 

२०२३-२४ मधील यू-डायसच्या माहितीनुसार तब्बल ४३५ शाळांवर दुरुस्तीचा उपचार करणे आवश्यक आहे; मात्र याकडेही प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसते. नुकताच भंडारा जिल्ह्यात एका चिमुकलीचा शाळेत विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाला. या घटनेमुळे पालकांना पाल्यांच्या जिवाची जास्तच काळजी वाटू लागली आहे. जीर्ण झालेल्या शाळेतील इलेक्ट्रिक वायरिंगदेखील खिळखिळी झाली आहे. भंडारा येथील घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने योग्य ते पाऊल उचलण्याची मागणी जोर धरत आहे.


कोणत्या तालुक्यात किती धोकादायक इमारती 
तालुका                    संख्या

वणी                            २७
पुसद                           २४
झरी                             ०२
महागाव                        ०१ 
घाटंजी                          ०१
उमरखेड                      ११
दिग्रस                          ०३
आर्णी                           ०१
मारेगाव                        ०१


प्रस्तावात निघाल्या त्रुटी
७९ शाळांच्या इमारती पाहून नवीन बांधण्यासंदर्भातचा प्रस्ताव शिक्षण विभागाच्या समग्र शिक्षा अभियानामधून वित्त विभागाकडे पाठविला होता; मात्र त्यात त्रुटी निघाल्याने प्रस्ताव परत पाठविण्यात आला आहे.


"नवीन शाळा बांधकाम व शाळा दुरुस्तीसाठी लागणाऱ्याा निधीचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे पाठविण्यात येणार आहे. सदर प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू आहे"
- प्रकाश मिश्रा, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि.प. यवतमाळ


नियोजनच्या निधीवरच मदार
२०२४-२५ या वर्षासाठी वार्षिक योजनेच्या निधीमधूनच शाळा बांध- कामासाठी तरतूद करावी लागणार आहे. त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी लागणार आहे. अजून नियोजनची सभा होऊ शकली नाही. बांधकामासाठी लागणाऱ्या निधीची मदार नियोजनवरच आहे. शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांना लोकप्रतिनिधींकडे निधीसाठी आग्रह धरावा लागणार आहे.

तालुकानिहाय नादुरुस्त शाळा
४३५ शाळांची दुरुस्ती करून त्या सुस्थितीत येऊ शकतात. आर्णी तालुक्यात दहा शाळा दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. बाभूळगाव तालुक्यात १५, दारव्हा तालुक्यात २७, दिग्रस ११, घाटंजी ३४, कळंब ८, महागाव ५४, मारेगाव २०, नेर, १. पांढरकवडा २६. पुसद ४१. राळेगाव १५, उमरखेड ३३, वणी ४५, यवतमाळ ४३, झरी तालुक्यातील ४२ शाळांची दुरुस्ती प्रशासनाला करावी लागणार आहे.

Web Title: In Yavatmal, 79 dangerous school buildings; students' lives are at risk in school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.