धावती चारचाकी पेटली, चार जण सुखरूप; कळंब-नागपूर मार्गावरील घटना
By विलास गावंडे | Published: March 23, 2024 05:20 PM2024-03-23T17:20:07+5:302024-03-23T17:21:33+5:30
सुदैवाने कुठलीही जीवहानी झाली नाही.
कळंब (यवतमाळ) : यवतमाळवरुन नागपूरकडे जाणाऱ्या महेंद्रा किन्टो या चारचाकी (एमएच ३२- वाय १३३५) वाहनाने कळंबपासून दोन किलोमीटर अंतरावर अचानक पेट घेतला. यामध्ये वाहन जळून खाक झाले. सुदैवाने कुठलीही जीवहानी झाली नाही. ही घटना शनिवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली.
हे वाहन अमोल बळीराम राठोड (५३, रा.सुखसागर सोसायटी, नागपूर) यांच्या मालकेचे आहे. ते कुटुंबासह यवतमाळवरून नागपूरकडे जात होते. त्यांच्या कुटुंबातील एक मुलगी ही गाडी चालवत होती. वाहनात चालक युवतीसह दोन महिला व दोन पुरुष, असे चार जण प्रवास करीत होते.
कळंब शहर ओलांडल्यानंतर दोन किलोमीटर अंतरावरील मामाचा ढाब्याजवळ वाहनाच्या बोनेटमधून अचानक धूर निघायला सुरुवात झाली. चालकाने प्रसंगावधान राखून गाडी रस्त्याच्या बाजूला घेतली. सर्वांना खाली उतरविण्यात आले. काही क्षणातच संपूर्ण गाडी जळून खाक झाली. हॉर्न डायरेक्ट होऊन शॉर्टसर्किट झाल्याने आग लागल्याचे सांगण्यात आले.
आगीची माहिती मिळताच हायवे रोडच्या सेवेत असणारा टँकर घटनास्थळी पोहोचला. टँकरद्वारे आग नियंत्रणात आणने सुरू असताना अग्निशमन दल दाखल झाले. तोपर्यंत वाहन जळून खाक झाले होते. या घटनेची नोंद कळंब पोलिसांनी घेतली आहे.