पुसद शहरात मध्यरात्री अग्नितांडव, ११ दुकाने खाक
By अविनाश साबापुरे | Published: March 1, 2024 05:21 PM2024-03-01T17:21:24+5:302024-03-01T17:22:26+5:30
लाखो रुपयाचे नुकसान, शॉर्टसर्किटमुळे झाल्याचा अंदाज.
अविनाश साबापुरे, पुसद (यवतमाळ) : शहरातील आंबेडकर चौकाजवळील दुकानांना गुरुवारी मध्यरात्री आग लागली. या आगीत तब्बल ११ दुकाने जळून खाकी झालीत. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगितले जात असून यात लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
या आगीत किराणा दुकान, हॉटेल, पान सेंटर, वेल्डिंग दुकान व इतर दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे. मिर्झा अहमद बेग, अरुण विश्वनाथ डाके, अनिल अरुण धुमाळे, अविनाश सीताराम बोरले, शेख इरशाद शेख अफसर, अब्दुल साजिद अब्दुल मजिद, जुबेर अहमद खान अहमद खान, नासिर जमा खा अहमद उमर खान, अहमद फैजल अहमद रशीद, मोहम्मद जुनेद मोहम्मद रशीद यांची दुकाने आगीत जळून खाक झाली आहेत. या आगीत कोणतीही मनुष्यहानी झाली नसली तरी लाखो रुपयाचा माल जळून खाक झाला आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
आग लागल्यानंतर नागरिकांनी त्वरित नगर परिषदेला याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच नगर परिषद येथील दोन अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. तरी सुद्धा आग आटोक्यात न आल्याने दिग्रस येथून अग्निशामक दलाच्या गाडीला पाचारण करण्यात आले होते. शेवटी शुक्रवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. याप्रकरणी नगर परिषद व शहर पोलिसांकडून नुकसान पंचनामा सुरु असून या आगीत दुकानाचे २५ लाखांच्या वर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. वृत्त लिहिस्तोवर शहर पोलिसांत या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल नव्हता.