दहावी पास पोरांनो...वाटेल तेथे घ्या ॲडमिशन; ४३ हजार जागा तुमच्यासाठीच

By अविनाश साबापुरे | Published: May 29, 2024 07:08 PM2024-05-29T19:08:37+5:302024-05-29T19:08:57+5:30

पारंपरिक अकरावीसह, आयटीआय, पाॅलिटेक्नीलाही संधी

In Yavatmal, More than 43 thousand seats in the district for further education for 10th pass students | दहावी पास पोरांनो...वाटेल तेथे घ्या ॲडमिशन; ४३ हजार जागा तुमच्यासाठीच

दहावी पास पोरांनो...वाटेल तेथे घ्या ॲडमिशन; ४३ हजार जागा तुमच्यासाठीच

यवतमाळ : मुंबई-पुण्यात अकरावी प्रवेशासाठी मारमार असली, तरी यवतमाळ जिल्ह्यात मात्र दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी यंदा भरघोस जागा उपलब्ध आहेत. यंदा जिल्ह्यातील ३६ हजार १३९ विद्यार्थ्यांनी दहावी पार केली. तर पुढच्या शिक्षणासाठी जिल्ह्यात ४३ हजारांपेक्षा अधिक जागा त्यांची वाट पाहाताहेत. त्यामुळे चिंतेची गरज नाही, पोरांनो वाट्टेल तेथे घ्या ॲडमिशन असे म्हणण्यासारखे सुखद चित्र आहे.

सोमवारी २७ मे रोजी दहावीच्या परीक्षेचा निकाल लागताच आता पुढे कुठले शिक्षण घ्यावे, पोराची ॲडमिशन कुठल्या अभ्यासक्रमाला घ्यावी, या विचारांचे काहूर पालकांच्या मनात दाटले आहे. परंतु, शिक्षण खात्याकडून यासंदर्भात माहिती घेतली असता, दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांपेक्षा जिल्ह्यात कितीतरी अधिक जागा उपलब्ध असल्याचे स्पष्ट करण्यात आले. पारंपरिक कला, विज्ञान, वाणिज्य या विद्याशाखांमध्ये अकरावीला प्रवेश घ्यायचा असल्यास जिल्ह्यातील ३४९ महाविद्यालयांमध्ये तब्बल ३५ हजार ५२० जागा यंदा उपलब्ध आहेत.

त्यासोबतच जिल्ह्यातील तीन तंत्रनिकेतन (पाॅलिटेक्नीक) महाविद्यालयांमध्ये ८१० जागा आहेत. गेल्या वर्षी एवढ्याच जागांसाठी तब्बल दीड हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती, हे विशेष. शिवाय जिल्ह्यात १८ शासकीय आणि चार अशासकीय अशा तब्बल २२ औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहेत. या २२ आयटीआयमधील विविध ट्रेडसाठी एकंदर चार हजार ५१६ जागा दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध राहणार आहेत. त्यासोबतच व्यवसाय अभ्यासक्रमाच्या दोन हजारांपेक्षा अधिक म्हणजे २२४० जागा विविध महाविद्यालयांमध्ये भरल्या जाणार आहेत. पाॅलिटेक्नीक व आयटीआयच्या जागा प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया सुरु होताना थोड्याबहुत कमी-जास्त होण्याची शक्यता आहे.

रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांकडे वाढता कल
कला, विज्ञान, वाणिज्य या विद्याशाखांमध्ये अकरावीला प्रवेश घेण्यासाठी दरवर्षी विद्यार्थी उत्सुक असतात. परंतु, गेल्या दोन वर्षांपासून दहावी झाल्यानंतर व्यवसाय अभ्यासक्रम, पाॅलिटेक्नीक तसेच आयटीआयमध्ये प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे.

लवकरच प्रवेश प्रक्रियेला सुरुवात
जिल्ह्यातील ३४९ महाविद्यालयांमध्ये अकरावीची प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे. त्याबाबत गुरुवारी ३० मे रोजी सर्व महाविद्यालयांना लेखी पत्र दिले जाणार असल्याचे शिक्षण विभागातून सांगण्यात आले. दहावीचा निकाल लागला तरी अजून गुणपत्रिका विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायच्या आहेत. गुणपत्रिका आल्यानंतर अकरावी प्रवेशाला सुरुवात होणार आहे. तर आयटीआय आणि पाॅलिटेक्नीकची प्रवेश प्रक्रियाही केंद्रीय पद्धतीनुसार लवकरच सुरु होणार आहे.

- जिल्ह्यात दहावी उत्तीर्ण विद्यार्थी : ३६,१३९
- पुढच्या शिक्षणासाठी उपलब्ध जागा : ४३,०८६

- अकरावीसाठी उपलब्ध काॅलेज : ३४९
- जिल्ह्यातील आयटीआय : २२
- जिल्ह्यातील पाॅलिटेक्नीक : ०३

कोणत्या अभ्यासक्रमाच्या किती जागा आहेत?
* जिल्ह्यात अकरावीच्या जागा : ३५,५२०
- कला शाखा : १८९००
- विज्ञान शाखा : १३७६०
- वाणिज्य शाखा : २८६०

* व्यवसाय अभ्यासक्रम : २२४०
- अकाउंटिंग : २४०
- ॲनिमल हसबंडरी : २००
- इलेक्ट्रिकल टेक्नाॅलाॅजी : ४२०
- इलेक्ट्राॅनिक टेक्नाॅलाॅजी : १८०
- ऑटोमोबाइल १२०
- कन्स्ट्रक्शन टेक्नाॅलाॅजी : १२०
- क्राॅप सायन्स : २००
- मार्केटिंग : १२०
- लाॅजिस्टिक : ४०
- हाॅर्टिकल्चर : ५२०
- बीएसएफ : ८०
* आयटीआय : ४,५१६
* पाॅलिटेक्नीक : ८१०

Web Title: In Yavatmal, More than 43 thousand seats in the district for further education for 10th pass students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.