विद्यार्थ्यांचे शाळेतील ‘पहिले पाऊल’ मजबूत करण्यासाठी गुरुजींना धडे
By अविनाश साबापुरे | Published: April 13, 2024 06:35 PM2024-04-13T18:35:36+5:302024-04-13T18:35:49+5:30
तालुकास्तरीय प्रशिक्षण : ३८० शाळांमध्ये पूर्वतयारी मेळाव्याचे नियोजन, शिक्षणाधिकारी देणार भेटी
यवतमाळ : पहिलीत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांची शाळेत येण्यापूर्वीच पायाभूत अभ्यासाची तयारी व्हावी, यासाठी प्रत्येक शाळेत ‘पहिले पाऊल’ अभियान राबविले जाणार आहे. ही पूर्वतयारी बालकांच्या मातांकडून कशी करुन घ्यावी याबाबत शनिवारी शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले.
डायट तसेच पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने हे शाळापूर्व तयारी अभियानाचे तालुकास्तरीय प्रशिक्षण येथील अभ्यंकर कन्या शाळेत आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डाॅ. प्रशांत गावंडे, उपशिक्षणाधिकारी राजू मडावी यांची उपस्थिती होती. प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ अधिव्याख्याते डॉ. रमेश राऊत, अधिव्याख्याता मधुमती सांगळे, मुख्याध्यापिका मोहना गंगमवार, केंद्रप्रमुख सुदर्शन थोटे, तालुका समन्वयक शुभांगी वानखडे, सहतालुका समन्वयक दीपलक्ष्मी ठाकरे, राजहंस मेंढे यांची उपस्थिती होती.
शिक्षण हा प्रत्येक विद्यार्थ्याचा मुलभूत अधिकार आहे. तो विद्यार्थ्यांना प्राप्त करवून देणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. शिक्षकांनी आरटीई व एनईपी यामधील तरतुदींचा अभ्यास करणे गरजेचे आहे, असे आवाहन यावेळी मान्यवरांनी केले. यवतमाळ तालुक्यात ३८० शाळांमध्ये १५ ते २० एप्रिल या कालावधीत शाळापूर्व तयारी मेळावा घेण्याचे नियोजन यावेळी करण्यात आले. शाळेत होणाऱ्या मेळाव्यांना शिक्षणाधिकारी भेटी देणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. बालकांच्या मातांना देण्यासाठी यावेळी उपक्रम कार्ड, आयडीया कार्ड, पहिले पाऊल पुस्तिका आदींबाबत शिक्षकांना माहिती देण्यात आली. गटशिक्षणाधिकारी पोपेश्वर भोयर यांच्या नियंत्रणात हे प्रशिक्षण पार पडले. प्रशिक्षण सत्राचे प्रास्ताविक शुभांगी वानखडे यांनी केले. सूत्रसंचालन वर्षा भुतनेर यांनी तर आभार दीपलक्ष्मी ठाकरे यांनी मानले.