राज्यावरून कापड येणार कापून, गावातली बाई देणार शिवून!

By अविनाश साबापुरे | Published: March 23, 2024 05:28 PM2024-03-23T17:28:27+5:302024-03-23T17:30:52+5:30

४४ लाख विद्यार्थ्यांना देणार दोन गणवेश, बचत गटांना मिळाला कार्यारंभ आदेश.

in yavatmal the cloth will come from the state to be cut and the village lady will sew it | राज्यावरून कापड येणार कापून, गावातली बाई देणार शिवून!

राज्यावरून कापड येणार कापून, गावातली बाई देणार शिवून!

अविनाश साबापुरे, यवतमाळ : जूनमध्ये सुरू होणाऱ्या शैक्षणिक सत्रात ४४ लाख ६० हजार विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन गणवेश शिवून मिळणार आहेत. त्यासाठी राज्य स्तरावरून ठराविक मापात कापलेला कापड पुरविला जाणार असून गावातल्या बचत गटाच्या महिला हा गणवेश शिवून शाळांपर्यंत पोहोचविणार आहे. याबाबतचा ‘कार्यारंभ’ आदेश महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडून देण्यात आला आहे.

इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना गणवेश पुरविण्याबाबत परिषदेमार्फत ई-निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. त्यातून मे. पदमचंद मिलापचंद जैन यांना ४ मार्च रोजी ४४ लाख ६० हजार ४ विद्यार्थ्यांसाठी कापड पुरवठ्याचा आदेश देण्यात आला आहे. हा कापड पुरविल्यानंतर गावपातळीवरील महिला बचत गटामार्फत गणवेशाची शिलाई केली जाणार आहे. त्यासाठी १३ मार्च रोजी महिला आर्थिक विकास महामंडळालाही ‘कार्यारंभ’ आदेश देण्यात आला आहे. 

विशेष म्हणजे, कापड पुरवठादार प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक बीआरसी, सीआरसीपर्यंत कापड पुरविणार आहे. तेथे गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील पाच मुख्याध्यापकांचा समावेश असलेल्या समितीच्या देखरेखीत तो कापड स्वीकारला जाणार आहे. या कापडाच्या बाॅक्सला केंद्र शासनाच्या वस्त्रोद्योग मंत्रालयांतर्गत टेक्स्टाईल कमिटीचे सील असल्याची खात्री करण्याची जबाबदारी या समितीवर असेल.

प्रत्येक विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीच्या गणवेशासाठी किती कापड लागेल, याची मागणी महिला आर्थिक विकास महामंडळाकडून नोंदविली जाणार आहे. जेवढे गणवेश द्यायचे आहेत, तेवढे कापड ठराविक (स्टँडर्ड) मापानुसार कापून (मायक्रो कटिंग करून) पुरवठा केला जाणार आहे. तेवढ्याच कापडात एक गणवेश शिवून देण्यासाठी बचत गटांना ११० रुपये याप्रमाणे मोबदला दिला जाणार आहे. शिवून तयार झालेल्या गणवेशाचा पुरवठा बचत गटामार्फत संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकापर्यंत करण्यात येणार आहे. शिलाईत त्रृटी आढळल्यास बचत गटामार्फतच दुरुस्ती केली जाणार आहे. 

६४ बाॅक्समध्ये येणार गणवेशाचा कापड -

प्रत्येक बीआरसी, सीआरसी केंद्रात इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी एकूण ६४ स्वतंत्र बाॅक्स उपलब्ध होतील. प्रत्येक बाॅक्समध्ये १०० गणवेशाच्या कापडाचे तुकडे (मायक्रो कटिंग केलेले) असतील. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी चार आणि प्रत्येक विद्यार्थिनीसाठी चार बाॅक्समध्ये हे कापडाचे तुकडे असतील. त्या तुकड्यांमधून बचत गटांना एक गणवेश तयार करून द्यायचा आहे. गणवेश शिवण्यापूर्वी बचत गटाच्या महिला संबंधित शाळेत जाऊन विद्यार्थी-विद्यार्थिनींची मापे स्टँडर्ड मापानुसार आहेत की नाही, याची खात्री करतील.

असा असेल गणवेश -

२०२४-२५ या सत्राकरिता दोन गणवेश पुरविले जाणार आहेत. यात एक गणवेश नियमित तर दुसरा स्काउट गाईडचा असेल. नियमित गणवेशामध्ये मुलांसाठी आकाशी रंगाचा शर्ट व गडद निळ्या रंगाची पँट, तसेच मुलींसाठी आकाशी रंगाचा शर्ट व गडद निळ्या रंगाचा स्कर्ट अशा प्रकारचा गणवेश राहणार आहे. आठवीच्या विद्यार्थिनीसाठी ओढणीसाठीही कापड पुरविला जाणार आहे.

Web Title: in yavatmal the cloth will come from the state to be cut and the village lady will sew it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.