झरी तालुक्यात दूधच नाही, तर खवा येतो कुठून?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2024 05:19 PM2024-11-06T17:19:41+5:302024-11-06T17:23:08+5:30
Yavatmal : भेसळयुक्त पदार्थामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम
लोकमत न्यूज नेटवर्क
मुकुटबन : सणवार आले की, भेसळीचा धंदा तेजीमध्ये येतो. त्यामुळे सामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते. सामान्य नागरिक बिनधास्तपणे गोड पदार्थ खरेदी करतात आणि सण साजरे करतात; परंतु भेसळयुक्त पदार्थामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो, याची त्यांना कल्पना नसते. अन्न सुरक्षा व कायदा २००६ नियमन अन्वये कारवाई करण्यात यावी तसेच दूध, खव्यापासून बनविलेली मिठाई, पनीर, स्वीट, तूप, बटर व नमकीनचे नमुने तपासण्यात यावेत, अशी मागणी होत आहे.
सणाला गोड पदार्थांचीच सर्वत्र रेलचेल असते; परंतु गोड पदार्थ तयार करण्यासाठी जे दूध, खवा, मावा लागतो, त्याचे उत्पादन नेहमीप्रमाणेच असते. मग अचानक सणावाराला मागणीच्या तुलनेत पुरवठा कसा होणार? त्यामुळे मग भेसळ करून माल वाढविण्यात येतो. परिणामी तालुकावासीयांच्या आरोग्याचे तीन तेरा वाजले असून अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष असल्यामुळे सणासुदीच्या काळात भेसळीचा धंदा जोरात सुरू आहे. एकीकडे दूध मिळणे कठीण झाले आहे. मग हे व्यावसायिक दुधापेक्षा कमी किमतीच्या पावडरचा वापर करून कृत्रिमरीत्या खवा बनवून त्यापासून मिठाई बनवतात. ही मिठाई आरोग्यासाठी घातक असून व्यावसायिक कोणत्या पदार्थापासून आपले उत्पादन बनवून विक्री करतात, याकडेसुद्धा अन्न व औषध प्रशासन विभागाचे दुर्लक्ष होत आहे. अन्न व औषध प्रशासन या विभागामार्फत कोणत्याही प्रकारची तपासणीच होतच नसल्याचे वास्तव आहे.
आदिलाबाद, पांढरकवडातून येते पाकिटाचे दूध
झरी तालुक्यात दुधाची कमतरता असून मुबलक प्रमाणात गावरानी दूध मिळतच नाही. आदिलाबाद, पांढरकवडा व वणी येथून पाकीटमध्ये विविध कंपन्यांचे दूध झरी व मुकुटबनला येते. मुकुटबनला कोणत्याही हॉटेलात संध्याकाळी पाच वाजतानंतर दुधाचा चहा मिळत नाही. तसेच कोणत्याही हॉटेलात किवा स्वीट मार्टमध्ये कढईत दूध आटवून दुधापासून खवा, मावा बनवताना दिसून येत नाही. तरीपण येथे खव्यापासून बनवलेल्या अनेक मिठाईची खुलेआम विक्री होत आहे. याकडे अन्न व औषध प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी आहे.