झेडपीमध्ये ‘टेबलां’च्या भाकरी फिरल्या; दोन दिवसात तब्बल ९७ जणांना हलविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2023 08:28 PM2023-05-23T20:28:39+5:302023-05-23T20:29:00+5:30
Yawatmal News जिल्हा परिषदेच्या गट क संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या जिल्हांतर्गत सर्वसाधारण बदल्यांची प्रक्रिया २२ जून पासून सुरू झाली आहे. यात सोमवारी ५० तर मंगळवारी ४७ अशा दोन दिवसात तब्बल ९७ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या.
यवतमाळ : जिल्हा परिषदेच्या गट क संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या जिल्हांतर्गत सर्वसाधारण बदल्यांची प्रक्रिया २२ जून पासून सुरू झाली आहे. यात सोमवारी ५० तर मंगळवारी ४७ अशा दोन दिवसात तब्बल ९७ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. वर्षानुवर्षे ठराविक टेबल न सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या भाकरी या निमित्ताने प्रशासनाने फिरविल्या आहेत. ही प्रक्रिया आणखी काही दिवस चालणार असल्याने अनेकांचे टेबल हादरण्याची शक्यता आहे.
सीईओ डाॅ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या उपस्थितीत समुपदेशनाने ही बदली प्रक्रिया राबविली जात आहे. पहिल्या दिवशी सोमवारी सामान्य प्रशासन विभागातील सहायक प्रशासन अधिकारी, विस्तार अधिकारी, वरिष्ठ सहायक, कनिष्ठ सहायक अशा ३२ जणांना बदल्या देण्यात आल्या. महिला बालविकासमधील एक पर्यवेक्षिका, दोन पाणीपुरवठा कनिष्ठ अभियंते, सिंचन विभागातील एक कनिष्ठ अभियंता, तसेच बांधकाम विभागातील ९ कनिष्ठ अभियंत्यांसह ५ स्थापत्य अभियंत्यांच्या बदल्या करण्यात आल्या. तर मंगळवारी २३ जून रोजी आणखी ४७ जणांच्या बदल्या झाल्या. यामध्ये वित्त विभागातील सहा कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या. त्यापैकी तिघांना विनंती बदली मिळाली तर तिघांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या.
याशिवाय ९ पशुधन पर्यवेक्षकांनाही बदल्या देण्यात आल्या. पंचायत विभागातील दोन विस्तार अधिकाऱ्यांना प्रशासकीय तर एका विस्तार अधिकाऱ्याला विनंती बदली देण्यात आली. सहा ग्रामविकास अधिकाऱ्यांनाही हलविण्यात आले. तर २३ ग्रामसेवकांचीदेखील बदली करण्यात आली. दरम्यान, २४ मे रोजी होणारी समुपदेशनाची प्रक्रिया आता २६ मे रोजी घेतली जाणार आहे.