शेतधुऱ्यावरील सागवान कटाईसाठी अडवणूक

By admin | Published: February 22, 2017 01:21 AM2017-02-22T01:21:43+5:302017-02-22T01:21:43+5:30

प्रचंड मेहनत घेऊन स्वत:च्या शेतातील धुऱ्यावर वाढविलेले सागवान तोडण्यासाठी शेतकऱ्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते.

Inadequate breeding season | शेतधुऱ्यावरील सागवान कटाईसाठी अडवणूक

शेतधुऱ्यावरील सागवान कटाईसाठी अडवणूक

Next

प्रश्न गंभीर : वनखात्याविषयी रोष, सेवानिवृत्तांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
यवतमाळ : प्रचंड मेहनत घेऊन स्वत:च्या शेतातील धुऱ्यावर वाढविलेले सागवान तोडण्यासाठी शेतकऱ्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. वनविभागाकडून होणारी अडवणूक या शेतकऱ्यांसाठी नुकसानकारक ठरत आहे. दुसरीकडे जंगल ठेकेदारांचे मात्र चांगलेच फावत आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी हा प्रश्न सेवानिवृत्त अधिकारी भीमराव झळके यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मांडला आहे.
शेती पिकासोबतच पूरक उत्पन्न व्हावे यासाठी अनेक शेतकरी शेताच्या धुऱ्यावर सागवानाची लागवड करतात. त्याचे संगोपन करून वाढवितात. झाडे परिपक्व झाल्यानंतर चांगली रक्कम हाती पडेल, अशी त्यांची अपेक्षा असते. मात्र बहुतांशवेळा त्यांच्या आशेवर वनविभागाच्या अडवणुकीच्या धोरणामुळे पाणी फेरले जाते.
शेताच्या धुऱ्यावर तसेच शेतामधील परिपक्व झालेली झाडे (सागवान) तोडण्यासाठी शेतकरी वनविभागाकडे अर्ज दाखल करतात. हे अर्ज निकाली काढण्यासाठी कित्येक दिवसांचा कालावधी लावला जातो. वारंवार येरझारा करूनही अर्जावर विचार होत नाही. गरज असतानाच या कामासाठी त्यांची अडवणूक केली जाते. कंत्राटदाराचे काम मात्र कुठल्याही अडथळ्याशिवाय निकाली काढले जाते. नाईलाजाने का होईना शेतकऱ्यांना आपल्या शेतातील सागवान कमी दराने विकावे लागतात.
वनविभागाकडून होत असलेली अडवणूक भीमराव झळके यांनी स्वत: घेतलेल्या अनुभवाच्या आधारेच या निवेदनातून मांडली आहे. त्यांनी २५ मे २०१५ पूर्वी शेतातील सागवान वृक्ष कटाईसाठी वनविभागाकडे अर्ज केला होता. तब्बल दीड वर्षांनंतर त्यांचा अर्ज मंजूर करण्यात आला. सेवानिवृत्त अधिकाऱ्यांसोबतच असा व्यवहार होत असेल तर सामान्य शेतकऱ्यांचे काय हाल असेल, असा प्रश्न त्यांनी या निवेदनातून मांडला आहे.
शासनाने या गंभीर प्रश्नावर विचार करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. १ एप्रिलला अर्ज आणि ३१ मेपर्यंत परवानगी अशा दोन महिन्यांच्या कालावधीत परवानगी मिळायला हवी असे त्यांनी या निवेदनातून सुचविले आहे. या काळात शेतामध्ये पीक उभे राहात नाही. त्यामुळे शेती पिकाचे नुकसान टाळले जावू शकते, असेही त्यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनी या निवेदनावर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणीही झळके यांनी केली आहे. (वार्ताहर)

Web Title: Inadequate breeding season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.