शेतकरी जिल्ह्यात शेतकरी विधवाच संमेलनाच्या उद्घाटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 10:06 PM2019-01-10T22:06:07+5:302019-01-10T22:07:38+5:30
आधी तिच्या जीवनाचे शोकांत नाटक झाले. मग तिच्या जिंदगानीवर साहित्यिकांनी नाटक लिहिले. ती स्वत:च त्या नाटकात नायिका झाली. अन् आता अखिल भारतीय साहित्य संमेलनाची ती उद्घाटक म्हणून जगापुढे जाणार आहे.
अविनाश साबापुरे / रूपेश उत्तरवार।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरी) : आधी तिच्या जीवनाचे शोकांत नाटक झाले. मग तिच्या जिंदगानीवर साहित्यिकांनी नाटक लिहिले. ती स्वत:च त्या नाटकात नायिका झाली. अन् आता अखिल भारतीय साहित्य संमेलनाची ती उद्घाटक म्हणून जगापुढे जाणार आहे. अखिल भारतातील मराठी सारस्वतांच्या सोहळ्याचे उद्घाटन करणाऱ्या या शेतकरी विधवेचे नाव आहे वैशाली सुधाकर येडे.
९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन कोण करणार हा विषय यंदा वादाचा झाला होता. नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द झाल्याचा वाद उभ्या महाराष्ट्रात पेटला. त्यानंतर शेतकºयांच्या जिल्ह्यात संमेलन होत आहे, तर उद्घाटनही शेतकरी महिलेच्याच हाताने व्हावे, असा आग्रह आयोजकांनी धरला अन् साहित्य महामंडळानेही होकार दिला. त्यानंतर वैशाली येडे यांच्या नावाची गुरुवारी सायंकाळी अधिकृत घोषणा झाली.
वैशाली यांचा जीवनसंघर्ष अत्यंत विदारक आहे. २००९ मध्ये राजूरच्या (ता. कळंब) येथील आठवीपर्यंत शिकलेल्या सुधाकर येडे या शेतकऱ्याशी वैशालीचे लग्न झाले. मोठे भासरे, सासू आणि सुधाकर व वैशाली असे एकत्र राहात होते. ९ एकर शेती होती. त्यात तीन हिस्से झाले. पण तेही तोंडी हिस्सेवाटणी झाली. सुधाकरच्या वाट्याला तीन एकर आले. शेवटी कौटुंबिक कलहातून सुधाकर व वैशालीला घराबाहेर काढण्यात आले. ते दोघेही गोठ्यात राहू लागले.
दुसºया बाळंतपणासाठी वैशाली माहेरी डोंगरखर्डा येथे असताना २० आॅक्टोबर २०११ रोजी सुधाकरने आपल्या शेतातच विष घेऊन आत्महत्या केली. त्यांच्यावर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व खासगी असे एक लाखांचे कर्ज थकित होते. आता ९ वर्षांचा मुलगा आणि ८ वर्षांची मुलगी घेऊन वैशाली सन्मानाने जगण्याची धडपड करीत आहे.
वैशालीचा मुलगा कुणाल मामाकडे राहून नवव्या वर्गात शिकतोय. तर मुलगी जान्हवी जिल्हा परिषद शाळेत शिकतेय. बारावीपर्यंत शिकलेली वैशाली गावातल्याच अंगणवाडीत शिपायी म्हणून काम करते. महिन्याला मिळणाºया ३ हजार रुपयात तिची गुजराण सुरू आहे. शिलाई मशिन चालवूनही ती पोरांसाठी पैसा जोडण्याचा प्रयत्न करते. आपल्यासारख्या इतरही एकट्या राहणाºया महिलांसाठी ती ‘एकल महिला संघटने’च्या माध्यमातून आधार बनली आहे.
२८ वर्षांची वैशाली येडे अत्यंत हिमतवान आहे. तिची कहाणी घेऊन वर्धा येथील हरिष इथापे यांनी ‘तेरवं’ हे नाटक लिहिलं. विशेष म्हणजे, या नाटकात वैशालीची भूमिका खुद्द वैशालीनेच केली. श्याम पेठकर लिखित आणि हरिष इथापे दिग्दर्शित ‘तेरवं’ नाटकाच्या निमित्ताने वैशालीसह विदर्भातील सात आत्महत्याग्रस्त शेतकरी महिलांचा संघर्ष जगापुढे आला आहे. आता शुक्रवारी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून वैशाली शेतकऱ्यांचे, ग्रामीण महिलांचे दु:ख जगापुढे आणणार आहे.
वैशाली म्हणते... रडू नका, सामना करा!
गजानन अक्कलवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कळंब : पतीच्या मृत्यूनंतर धडपडणाऱ्या महिलांना संदेश देताना त्या म्हणाल्या, महिलांनो रडू नका. संकटांचा सामना करा. कर्ता पुरुष गेल्यावर कुटुंबाची वाताहत होते. पण घाबरण्यापेक्षा सावरायला शिकले पाहिजे. आत्महत्या हा कोणत्याही समस्येवर पर्याय नाही. आज साहित्य संमेलनाची उद्घाटक म्हणून मला मान मिळाल्याचे कळले अन् गेल्या आठ वर्षातील संपूर्ण संघर्ष स्मृतिपटलावर जिवंत झाला. असा प्रसंग कुणावरही येऊ नये... बोलता बोलता वैशाली यांच्या डोळ्यांना अश्रूंच्या धारा लागल्या. अशा स्थितीतही त्या धीराने म्हणाल्या, साहित्य संमेलनातून शेतकरी सुखी झाला पाहिजे!
‘लोकमत’ने पोहोचविली आनंदवार्ता
साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून आपले नाव घोषित झाले, हे वैशाली येडे यांना ठाऊकही नव्हते. यवतमाळात घोषणा होताच सर्वात आधी ‘लोकमत’च्या सदर प्रतिनिधीने वैशालीच्या घरी जाऊन अभिनंदन केले. ‘लोकमत’मुळेच आपल्याला ही सन्मानजनक बातमी कळल्याचे वैशाली येडे यावेळी म्हणाल्या.
संमेलनावर महिलांचाच पगडा
आजवर झालेल्या ९१ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांच्या इतिहासात केवळ तीन वेळा महिलांना संमेलनाध्यक्षपदाचा बहुमान मिळाला. यवतमाळात होत असलेल्या ९२ व्या संमेलनात डॉ. अरुणा ढेरे यांच्या रुपाने चौथ्यांदा एका महिलेला हा मान मिळाला. तोही बिनविरोध. असाच उद्घाटक पदाचा मानही नयनतारा सहगल यांच्या रूपाने एका प्रज्ञावंत महिलेलाच देण्यात आला होता. नंतरच्या घडामोडीत त्यांचे नाव रद्द झाले. पण उद्घाटक पदावर वैशाली येडे यांच्या रूपाने पुन्हा महिलाच विराजमान होणार आहे. शिवाय, याच संमेलनाच्या वादातून साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदाहून डॉ. श्रीपाद जोशी बाजूला झाले, अन् त्यांची जबाबदारी विद्या देवधर यांच्या रुपाने एका महिलेकडेच आली. आता या संमेलनाच्या व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष, उद्घाटक आणि साहित्य महामंडळ अध्यक्ष या तिन्ही आसनांवर महिलाच पाहायला मिळणार आहेत.
साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी माझे नाव जाहीर झाले, हे मला ‘लोकमत’मुळेच कळते आहे. पण ही अतिशय आनंदाची बाब आहे. हा आनंद कोणत्या शब्दात सांगावा, हेच सुचेनासे झाले आहे.
- वैशाली सुधाकर येडे, (राजूर)
उद्घाटक, अ.भा.मराठी साहित्य संमेलन यवतमाळ