फुले-आंबेडकर समता पर्वाचे उद्घाटन
By admin | Published: April 9, 2016 02:46 AM2016-04-09T02:46:30+5:302016-04-09T02:46:30+5:30
महात्मा ज्योतिबा फुले - डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता पर्व २०१६ चे गुरुवारी सायंकाळी
समता मैदान : विविध मनोरंजन, ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाने गर्दी खेचली
यवतमाळ : महात्मा ज्योतिबा फुले - डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता पर्व २०१६ चे गुरुवारी सायंकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून थाटात उद्घाटन पार पडले.
यावेळी व्यासपीठावर उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, समाजकल्याण उपायुक्त विजय साळवे, जिल्हा कृषी अधिकारी दत्तात्रेय गायकवाड, दीपक नगराळे, अशोक वानखेडे, ज्ञानेश्वर गोरे, डॉ. दिलीप घावडे, प्रा.बाळकृष्ण सरकटे, डॉ.सुभाष जमदाडे, प्रमोदिनी रामटेके, डॉ.स्मिता गवई, उज्ज्वला इंगोले, अरविंद कुडमेथे, कवडू नगराळे, अंकुश वाकडे, अमृत निखाडे, अनिल आडे आदी उपस्थित होते.
प्रारंभी ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय मालिकेतील कलावंतांनी विविध मनोरंजनाचा कार्यक्रम सादर केला. भरगच्च भरलेल्या प्रेक्षागारांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. मनोरंजनाच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीस अमृता हिने भीमगीत सादर केले. अभिजित कोसंबी याने ‘दलितांचा राजा भीमराव माझा’ हे गीत सादर करून जनमानसात चैतन्य आणले. त्यानंतर हास्य अभिनेते भाऊ कदम आणि कुशल बद्रिके या जोडगोळीने प्रासंगिक विनोदांनी रसिकांना हसत ठेवले. ‘गौरव महाराष्ट्र’ फेम धनश्री देशपांडे हिने भुलभुलैया चित्रपटातील गाण्याने सर्वांना धुंद केले. धनश्री दळवी आणि मेघा या जोडीने ‘मला लागली कुणाची उचकी’, ‘मै कोल्हापुर से आयी हु’ इत्यादी गाण्यांवर नृत्याविष्कार केला.
विदर्भाचा कलावंत भारत गणेशपुरे आणि सागर कारंडे यांनी ‘भाई’ होण्याची पात्रता विषद केली. बाजीराव मस्तानी चित्रपटातील प्रसिद्ध गाणे ‘पिंगा गं पोरी पिंगा’ या गाण्यातील अदाकारीने रसिकांना प्रफुल्लीत केले. भाऊ कदम आणि कुशल बद्रिके यांनी ‘विद्यार्थी आणि शिक्षक’ हे नाट्य सादर केले. भारत आणि सागर यांनी वधू-वर सूचक मंडळ बंद केल्यानंतर सेकंडहॅन्ड गाड्या विकण्याचा धंदा सुरू केल्यावरची धमाल सांगितली. यवतमाळातील कलावंत अजिंक्य सोनटक्के याने गिटारच्या माध्यमातून फ्यूजन सादर केले. त्यानंतर अभिजित कोसंबी यांच्या आणि धनश्रीच्या गाण्याने या हास्य मनोरंजनात्मक कार्यक्रमाचा शेवट झाला. पहिल्याच दिवशी या कार्यक्रमाने गर्दीचा उच्चांक नोंदविला. बसण्यास खुर्च्या कमी पडल्याने अनेकांनी उभे राहून या कार्यक्रमाचा आनंद लुटला. (सांस्कृतिक प्रतिनिधी)