कुस्त्यांच्या दंगलीचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 01:42 AM2017-11-26T01:42:25+5:302017-11-26T01:42:49+5:30
स्वातंत्र संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या स्मृतीदिनानिमित्त जिल्हा कुस्तीगिर संघातर्फे येथील ऐतिहासिक हनुमान आखाड्यात आयोजित काटा कुस्त्यांच्या विराट दंगलीचे .....
ऑनलाईन लोकमत
यवतमाळ : स्वातंत्र संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या स्मृतीदिनानिमित्त जिल्हा कुस्तीगिर संघातर्फे येथील ऐतिहासिक हनुमान आखाड्यात आयोजित काटा कुस्त्यांच्या विराट दंगलीचे माजी आमदार कीर्ती गांधी यांच्या हस्ते कुस्त्यांचे जोड लावून उद्घाटन करण्यात आले. शंकर धोत्रे यवतमाळ व मोहनप्रकाश आंबडकर आकोट या दोन पहेलवानांदरम्यान झालेल्या उद्घाटनीय कुस्तीत शंकर पहेलवानाने बाजी मारली.
शनिवारी दुपारी १२.३० वाजता हलगी, तुतारी व डफाच्या निनादात कुस्त्यांच्या दंगलीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा कुस्तीगिर संघाचे अध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, सचिव अनिल पांडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवींद्र ढोक, रमेश भिसनकर, प्रताप पारसकर, काशीनाथ ब्राम्हणे, दीपक ठाकूर, रामेश्वर यादव, सुरेश लोहाणा, प्रवीण पोटे, विजय डांगे आदी उपस्थित होते. १० लाख रुपयांची जंगी लयलूट असलेल्या या कुस्त्यांच्या दंगलीत देशभरातील नामवंत मल्लांनी सहभाग नोंदविला आहे.
दिल्ली, भिलाई, हरियाणा, मुंबई, कोल्हापूर, सांगली, पुणे, हिंगोली, अमरावती, औरंगाबाद, नांदेड, पुसद, वाशीम, अकोला व ग्रामीण भागातील ५०० ते ५५० मल्लांनी या दंगलीत भाग घेतला. दिल्ली येथील आसीफ पहेलवान, हरिंदर पहेलवान, योगेश पहेलवान, पुणे येथील मोसीन सौदागर, तुषार डोबे, सुहास घोडगे, जमीर पहेलवान, कोल्हापूरचा श्रीपती कर्नाळ हे पहेलवान प्रेक्षकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले. उद्घाटनीय कुस्तीनंतर १००, २००, ३००, ४०० व ५०० रुपये बक्षीस असलेल्या कुस्त्यांचे जोड लावण्यात आले. सायंकाळी ७.३० वाजतापासून प्रतिष्ठेच्या १२ क्रमांकापर्यंतच्या कुस्त्यांना सुरूवात झाली होती. पंच म्हणून उद्धव बाकडे, महंमद शकील, सुरेश जयसिंगपूरे यांनी काम पाहिले. कुस्त्यांचे जोड लावण्याची जबाबदारी गजानन जाधव, गजानन उजवणे, आनंद जाधव, धनराज मिसाळे, नामदेव काळे, संदीप नेवारे, सुभाष जुमळे, पवन पांडे यांनी पार पाडली.
विजय दर्डा यांनी लावली कुस्ती
काटा कुस्तीच्या विराट दंगलीला दुपारी ३.३० वाजता लोकमत मीडिया प्रा.लि.च्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा, लोकमत जिल्हा कार्यालय प्रमुख किशोर दर्डा यांनी भेट दिली. जिल्हा कुस्तीगिर संघाच्यावतीने त्यांचे स्मृतीचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले. नंतर विजय दर्डा यांच्या हस्ते राजू किनाके व तानबाजी शेटे पहेलवान यांची कुस्ती लावण्यात आली. यात राजू किनाके विजयी ठरले.