एसटीच्या यवतमाळ विभागाची उत्पन्नाची बाजू होतेय कमकुवत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 05:00 AM2021-02-28T05:00:00+5:302021-02-28T05:00:00+5:30
उत्पन्न नसल्याने एसटीला मागील मार्च महिन्यापासून मोठ्या आर्थिक प्रश्नाला तोंड द्यावे लागले. अलीकडे काही महिन्यांत ही बाजू सुधारत असतानाच नियोजनाचा बोजवारा उडाला आहे. बस स्थानकाच्या अगदी समोरून अवैध प्रवासी वाहतुकीची वाहने एसटीचे प्रवासी ओढून नेत आहेत. सकाळच्या वेळी इतर खासगी वाहनांचीही या ठिकाणी गर्दी होते. २०० मीटरच्या आतच ही वाहने उभी करून बस स्थानकातून प्रवासी घेऊन जातात. यावर कुणाचेही नियंत्रण नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या यवतमाळ विभागातील उत्पन्नाची बाजू कमकुवत होत असल्याचा कर्मचाऱ्यांचा सूर आहे. बसफेऱ्यांचे चुकत असलेले नियोजन, प्रवाशांचा खासगी वाहनांकडे वाढत चाललेला कल, अधिकाऱ्यांचे होत असलेले दुर्लक्ष आदी बाबी याला कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. राहात असलेल्या त्रुटी निदर्शनास आणून दिल्यानंतरही त्या दूर करण्याचा प्रयत्न केला जात नसल्याची ओरड होत आहे.
अनेक मार्गांवरील बसफेऱ्या अक्षरश: दोन ते चार प्रवासी घेऊन धावतात. प्रत्येक पाच मिनिटांनंतर प्रामुख्याने अमरावती, नागपूर मार्गावर बसेस सोडल्या जातात. स्थानिकसह बाहेर आगाराच्या बसेसचीही त्यामध्ये भर पडते. याच बसफेऱ्या काही अंतराने सोडल्यास प्रवाशांच्या सोयीचे होईल. शिवाय महामंडळाला अधिक प्रवासी मिळून उत्पन्नात भर पडेल. सकाळी प्रवासी संख्या कमी असते. अशावेळी थोड्या अंतराने बसेस सोडणे अपेक्षित आहे.
उत्पन्न नसल्याने एसटीला मागील मार्च महिन्यापासून मोठ्या आर्थिक प्रश्नाला तोंड द्यावे लागले. अलीकडे काही महिन्यांत ही बाजू सुधारत असतानाच नियोजनाचा बोजवारा उडाला आहे. बस स्थानकाच्या अगदी समोरून अवैध प्रवासी वाहतुकीची वाहने एसटीचे प्रवासी ओढून नेत आहेत. सकाळच्या वेळी इतर खासगी वाहनांचीही या ठिकाणी गर्दी होते. २०० मीटरच्या आतच ही वाहने उभी करून बस स्थानकातून प्रवासी घेऊन जातात. यावर कुणाचेही नियंत्रण नाही. जिल्ह्यातील जवळपास आगारांमध्ये अशीच काहिशी परिस्थिती आहे.
उत्पन्न वाढविण्यासाठी मध्यवर्ती कार्यालयाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालनही अपवादानेच होते. प्रवाशांना सुखकर आणि सुरक्षित प्रवास करता यावा, यासाठी सुचविलेल्या उपाययोजना केल्या जात नाहीत. बसची योग्य स्वच्छता होत नाही, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घालून देण्यात आलेल्या नियमांचे पालनही केले जात नाही. एसटी बसेस शॅम्पू, सोड्याने धुण्याचा घेण्यात आलेला निर्णयही यवतमाळ विभागात गुंडाळून ठेवण्यात आला आहे. आगार प्रमुखांनी या सर्व बाबींवर लक्ष केंद्रित करून त्या करून घेण्याची अपेक्षा आहे. यातील काही अधिकारी गंभीर नसल्याची ओरड होत आहे.
अखेर ‘त्या’ फेरीला एक पैसाही उत्पन्न नाही
यवतमाळ आगारातील जितेंद्र पाटील या वाहकाने एसटीचे उत्पन्न कमी होण्यामागील स्वानुभव तक्रारीद्वारे विभाग नियंत्रकांकडे मांडले. १५ फेब्रुवारी रोजी त्यांना बरीच घासाघीस झाल्यानंतर अमरावती मुक्कामी कामगिरी मिळाली. यासाठी अडीच ते तीन तास उशिराने बस मिळाली. त्या वेळी ७० ते ८० प्रवासी या बसला मिळाले. अवघ्या काही मिनिटांत बस सुटणार होती. तेवढ्यातच पाटील यांना बाभूळगावपर्यंत जाण्याचा आदेश देण्यात आला. आता बस सुटण्यास विलंब होईल, असे वाटल्याने अमरावती बसमधील प्रवासी उतरून गेले. पाटील यांना यवतमाळ-बाभूळगाव बसचे उत्पन्न केवळ १२० रुपये मिळाले. बाभूळगावहून यवतमाळ येताना शून्य उत्पन्न झाले. यात महामंडळाचे आठ ते नऊ हजार रुपयांचे नुकसान झाले. जाणीवपूर्वक कामगिरी बदलविण्याचा संबंधित अधिकाऱ्याने केलेला प्रकार यामुळे महामंडळाचे नुकसान होण्यासोबतच जनमाणसात एसटीची प्रतिमा मलीन झाली. यामुळे संबंधित दोषींवर कारवाई करावी, अशी विनंती त्यांनी विभाग नियंत्रकांकडे केली आहे.