‘इनकमिंग’ गणपतीचे, ‘आऊटगोर्इंग’ गुंडांचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2019 06:00 AM2019-09-02T06:00:00+5:302019-09-02T06:00:04+5:30

सीआरपीसी कलम १०७ नुसार नऊ हजार ५४९ केसेस, सीआरपीसी कलम ११० नुसार ४३९ केसेस, सीआरपीसी कलम १४४ नुसार ४३७, मुंबई दारुबंदी कायद्यातील कलम ९३ नुसार ५५७ केसेस करण्यात आल्या आहेत. याशिवाय मुंबई पोलीस कायद्यातील कलम ५५, ५६, ५७ यानुसार ९१ सक्रिय गुंडांच्या तडीपारीचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहे.

'Incoming' Ganapathy, 'outgoing' gangsters | ‘इनकमिंग’ गणपतीचे, ‘आऊटगोर्इंग’ गुंडांचे

‘इनकमिंग’ गणपतीचे, ‘आऊटगोर्इंग’ गुंडांचे

Next
ठळक मुद्देपोलीस ‘विघ्नहर्ते’ : तडीपारीचे ९१ प्रस्ताव, चौघांवर एमपीडीए, ११ हजारांवर प्रतिबंधात्मक कारवाई

सुरेंद्र राऊत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यातील सण-उत्सव शांततेत पार पडावे यासाठी पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाईची धडक मोहीम राबविण्यात आली. प्रतिबंधात्मक कारवाईची निरंतर प्रक्रिया सुरू होती. या अंतर्गत सीआरपीसीच्या कलमान्वये व दारूबंदी कायद्यानुसार दहा हजार ९८२ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली. शिवाय ९१ जणांच्या तडीपारीचा प्रस्ताव तयार केला आहे. तर चार जणांविरुद्ध एमपीडीएची कारवाई केली. सहा प्रस्ताव निर्णय प्रक्रियेत आहे.
जिल्ह्यातील ३१ पोलीस ठाणे व सहा उपविभागातून सक्रिय गुन्हेगारांची कुंडली गोळा करण्यात आली. त्या आधारावरच प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. यामध्ये सीआरपीसी कलम १०७ नुसार नऊ हजार ५४९ केसेस, सीआरपीसी कलम ११० नुसार ४३९ केसेस, सीआरपीसी कलम १४४ नुसार ४३७, मुंबई दारुबंदी कायद्यातील कलम ९३ नुसार ५५७ केसेस करण्यात आल्या आहेत. याशिवाय मुंबई पोलीस कायद्यातील कलम ५५, ५६, ५७ यानुसार ९१ सक्रिय गुंडांच्या तडीपारीचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहे. एमपीडीए अंतर्गत चार जणांवर कारवाई करण्यात आली. तर सहा जणांविरुद्ध एमपीडीए प्रस्ताव तयार केले असून निर्णय प्रक्रियेत आहेत. सीआरपीसीच्या कलम १५१ (३) नुसार दोन जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. सण-उत्सवाच्या काळात रेकॉर्डवरील सक्रिय गुन्हेगारांना स्थानबद्ध करण्याचे प्रस्ताव यात अंतर्भुत आहेत. एकंदरच गणपती, मोहरम, दुर्गा उत्सव व इतर धार्मिक सण शांततेत पार पडावे यासाठी ठोस उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी प्रत्येक महिन्याच्या क्राईम मिटींगमध्ये प्रतिबंधात्मक कारवाईवर विशेष फोकस केला. परिणामी इतक्या मोठ्या प्रमाणात केसेस करणे शक्य झाले. पेट्रोलिंग, गस्त या पेक्षाही प्रतिबंधात्मक कारवाई गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरणारी आहे. त्यानुसारच नियोजन करण्यात आले आहे. सण-उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सर्वच पोलीस ठाण्यांतर्गत जातीय सलोखा कार्यक्रम घेण्यात आले. जिल्ह्यात १ जानेवारी ते ३१ आॅगस्टपर्यंत ५९ कार्यक्रम झाले. शांतता समितीच्या २०९ बैठका घेण्यात आल्या. पोलीस मित्र समितीच्या १८१, गणपती मंडळाच्या २९८ अशा विविध प्रकारच्या ७४७ बैठका झाल्या आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक आणि त्या विभागातील उपअधीक्षक यांच्या उपस्थितीत ठाणेदारांनी या बैठका घेतल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने ठिकठिकाणी घेतलेल्या बैठकांचा आता सकारात्मक परिणाम दिसू लागला आहे.
उत्सवात नागरिकांनीही सहकार्य करावे - एसपी
गणपती उत्सवात सहा उपविभागीय पोलीस अधिकारी, वनरक्षक, २२ पोलीस निरीक्षक, १०८ सहायक पोलीस निरीक्षक, १ हजार ९९३ कर्मचारी, होमगार्ड ७०० पुरुष व २०० महिला, एसआरपीएफची एक कंपनी व दोन प्लाटून याशिवाय एसपीओचे एक हजार ३८१ जवान तैनात केले जाणार आहे. मोहरम आणि गणपती विसर्जनासाठी याचे नियोजन करण्यात आले आहे. ऐनवेळेवर जिल्ह्यातून २२ पोलीस उपनिरीक्षक पदोन्नतीने बाहेर गेले. त्यांच्या रिक्त जागेवर अद्याप तरी अधिकारी आलेले नाहीत. त्यानंतरही बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. कुठेही अनुचित प्रकार होणार नाही याची पुरेपूर दक्षता घेण्यात आल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी सांगितले. सण-उत्सवात नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

 

Web Title: 'Incoming' Ganapathy, 'outgoing' gangsters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस