पुसद उपजिल्हा रुग्णालयात नागरिकांची गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:18 AM2021-05-04T04:18:53+5:302021-05-04T04:18:53+5:30
लसीकरणाचे नियोजन नाही : उन्हामुळे अनेकांना आली भोवळ पुसद : येथील उपजिल्हा रुग्णालयात १ मेपासून १८ ते ४४ वर्षे ...
लसीकरणाचे नियोजन नाही : उन्हामुळे अनेकांना आली भोवळ
पुसद : येथील उपजिल्हा रुग्णालयात १ मेपासून १८ ते ४४ वर्षे वयोगटातील तरुणांच्या लसीकरणाला प्रारंभ झाला आहे. ज्येष्ठांचे लसीकरण सुरूच आहे. लोकांमध्ये लसीकरणबाबत मोठी जागृती झाल्याने उपजिल्हा रुग्णालयात दररोज प्रचंड गर्दी होताना दिसत आहे. मात्र, उपजिल्हा रुग्णालयाचे लसीकरणाबाबत नेमके नियोजन नसल्याने गोंधळ उडत आहे.
लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांना भर उन्हात ताटकळत उभे राहावे लागते. येथे सावलीसाठी मंडप नाही. वृद्धांना बाहेर बसण्यासाठी खुर्च्या नाहीत. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने नागरिकांमधून प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. २ मे रोजी तर या ठिकाणी काही वृद्धांना भोवळ आल्याचीही माहिती आहे. उपजिल्हा रुग्णालय प्रशासन व आमदारांनी सुविधा उपलब्ध करून द्याव्या व ज्येष्ठांसह तरुणांचीही गैरसोय टाळावी, अशी मागणी जनतेतून होत आहे.